Wednesday, June 24, 2026
HomeनगरAhilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

भंडारदरात पाण्याची आवक सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

काही काळासाठी मान्सून रेंगाळल्यानंतर आता पुन्हा मोसमी वार्‍यांचा वेग वाढला आहे. अहिल्यानगर, पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सून दाखल झाला असून दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात वारे पसरणार आहे. काल मंगळवारी जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस सुरू होता. पाऊस पडता झाल्याने शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक समाधानी झाले आहेत.

- Advertisement -

जूनमध्येही पावसाला न झालेली सुरुवात आणि धरणातील कमी होणारा पाणीसाठा पाहता,या जिल्ह्याची भिस्त आता जुलैमध्ये पडणार्‍या पावसावर आहे.
अहिल्यानगर शहर व परिसरात काल दुपारी काही काळ पाऊस कोसळला. पारनेर, पाथर्डीत पाऊस सुरू होता. श्रीरामपूर शहर व तालुक्यातील बेलापूर, टाकळीभान, माळवाडगावसह विविध भागात काल सकाळपासूनची पाऊस सुरू होता. अधूनमधून होणारी रिपरिप यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच पाण्याअभावी आणि वाढत्या उष्म्याने भाजीपाला, फळबागा जळू लागल्या होत्या. त्यांनाही दिलासा मिळाला आहे.

देवळाली प्रवरा परिसरातील वादळी पावसामुळे लाख रस्ता भागात शेतकरी मच्छिंद्र बापू काळे यांच्या गोठ्यावर विजेच्या तारा तुटून पडल्याने विद्युत प्रवाह पसरला आणि त्यात आठ गायींचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. राहुरी, राहाता, कोपरगाव, संगमनेर, अकोलेतही काही भागात पाऊस कोसळत होता. या पावसामुळे पेरणीची शक्यता वाढली आहे. तसेच पाऊस नसल्याने अनेक कृषी दुकानांमध्ये खतेल बियाणे पडून होते. त्याला आता मागणी वाढणार असून ही दुकाने शेतकर्‍यांनी फुलून जाणार आहेत.

आगामी सात ते आठ दिवसांमध्ये राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये मान्सून जोरदार बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. यासोबतच जलाशय आणि धरणांमधील पाण्यासाठ्यात वाढ होऊ शकतो. यामुळे पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न हळूहळू सुटण्याची शक्यता आहे.

भंडारदरात पाण्याची आवक सुरू; मुळा पाणलोटात पावसाचा जोर

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण परिसर आणि पाणलोटात सलग गत तीन दिवसांपासून पाऊस कोसळत असल्याने डोंगर दर्‍यांमधील धबधबे सक्रीय झाले आहेत. ओढे नालेही खळखळू लागल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक होत आहे. काल सकाळच्या आकडेवारीनुसार 19 दलघफू पाणी दाखल झाले. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात पाणीसाठा 2378 दलघफू झाला होता.

एरव्ही जुलैमध्ये भंडादरार पाणलोटात जोरदार पाऊस बरसत असतो. पण यंदा जून संपत आला तरी पावसाचे आगमन झाले नव्हते. त्यामुळे पाणलोट आणि लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण होते. पण शनिवार, रविवार आणि सोमवारीही पाऊस कोसळला. काल मंग़ळवारीही दिवसभर अधूनमधून रिपरिप सुरू होती. कळसूबाई शिखर, घाटघर,पांजरेतील डोंगरदर्‍या धुक्याने लेपाटून गेल्या आहेत. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. काल सकाळी नोंदविल्या गेल्यानुसार भंडारदरात 28, घाटघर 22, पांजरे 37, रतनवाडीत 23 आणि वाकीत 23 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धणात काल सायंकाळी 2385 दलघफू (21.60टक्के) पाणीसाठा होता. तर निळवंडेत 1562 (18.74टक्के) पाणीसाठा होता.

मुळा पाणलोटात पावसाचा जोर
कोतूळ वार्ताहराने कळविले की, मुळा धरणाच्या पाणलोटातील अकोले तालुक्यातील हरिश्चंद्र गड, पाचनई, कोतूळ भागात गत दोन दिवसांपासून पावसाचा जोर टिकून आहे. त्यामुळे भातरोपांना जीवदान मिळाले आहे. पावसाचा जोर वाढल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे आंबित धरण भरल्यानंतर मुळा नदी वाहती होईल.

गंगापूर, दारणा पाणलोटात पावसाची हजेरी

राहाता तालुक्यातही पाऊस

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल सायंकाळी 4.30 वाजेनंतर आर्द्रा नक्षत्रातील पावसाने हजेरी लावली. उशीरा का होईना पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही दिवसात धरणांच्या पाणीसाठ्यात नवीन पाणी दाखल होण्याची दाट शक्यता आहे.

मान्सूनने गेल्या 5 जूनपासून तर 20 जून पर्यंत तळकोकणात मुक्काम ठोकला होता. त्यामुळे सर्वस्तरावर चिंता वाढली होती. शासनाने पिण्याच्या पाण्याचे सुक्ष्म नियोजन करुन पुढील संभाव्य पाणी टंचाई विचारत घेऊन नियोजन केले होते. त्यामुळे चालू सिंचन आवर्तनही बंद करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मान्सूनने केलेली प्रगती निश्चितपणे दिलासादायक आहे. खरीप 25 जून ते 5 जुलै या कालखंडात बहुतांश भागात खरीपाच्या पेरण्या सुरु होतील. असे चित्र आहे.

काल दुपारी 3 पर्यंत ढगाळ वातावरण होते. हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले होते. 3 वाजे नंतर साधरणत 2 तास पावसाने मध्यम स्वरुपाच्या पावसाचे आगमन झाले. या पावसामुळे काही भागात पेरणी युक्त पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी आहे. हालक्या जमिनीत पेरण्या होऊ शकतील. काळ्या जमिनीला मात्र पावसाची अजुन अपेक्षा आहे. 5 ते 6 इंच ओल झाल्यानंतरच पेरणी करणे उचित होईल.

दरम्यान, काल नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाने मध्यम स्वरुपाची हजेरी लावली. 3 जून ला, 22 जूनला व काल 23 जूनला पावसाने हजेरी लावली. काल मंगळवारी सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासांत भाम धरणाच्या भिंतीजवळ 40 मिमी (एकूण 87 मिमी), पावसाची नोंद झाली. भावलीला 60 मिम (एकूण 141 मिमी), वालदेवी 1 मिमी (एकूण 11 मिमी), गंगापूर 22 मिमी (एकूण 66 मिमी), कश्यपी 30 मिमी (एकूण 75 मिमी), गौतमी गोदावरी 53 मिमी (एकूण 72 मिमी), मधमेश्वर 13 मिमी (एकूण 13 मिमी), घोटी 4 मिमी (एकूण 44 मिमी), इगतपूरी 26 मिमी (एकूण 46 मिमी), त्र्यंबक 63 मिमी (एकूण 85 मिमी), अंबोली 35 मिमी (एकूण 133 मिमी).

गोदावरी कालव्यांवरील पाऊस असा – देवगाव 24 मिमी (एकूण 51 मिमी), ब्राम्हणगाव 26 मिमी (एकूण 46 मिमी), कोपरगाव 28 मिमी (एकूण 32 मिमी), सोमठाणा 62 मिमी (एकूण 72 मिमी), कोळगाव 9 मिमी (एकूण 9 मिमी), सोनेवाडी 3 मिमी (एकूण 3 मिमी) असा पाऊस नोंदला गेला. कालही दुपारनंतर या भागात मध्यम स्वरुपाचा पाउस झाला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राष्ट्रपती पोलीस पदकप्राप्त एलसीबीचा पीएसआय वाघ निलंबित

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत नेवासा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एका गाजलेल्या कारवाईप्रकरणी हप्त्याची मागणी केल्याच्या गंभीर आरोपांच्या चौकशीनंतर स्थानिक गुन्हे शाखेतील (एलसीबी)...