Tuesday, February 3, 2026
HomeनगरAhilyanagar : पालिकांना आज मिळणार नवे कारभारी

Ahilyanagar : पालिकांना आज मिळणार नवे कारभारी

जिल्ह्यातील 11 नगरपालिका व एका नगरपरिषदेसाठी आज मतमोजणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान पुढे ढकलण्यात आलेल्या जिल्ह्यातील तीन पालिका व एका नगरपरिषदेसाठी, तसेच सात पालिकांमधील नगरसेवकांच्या 12 जागांसाठी शनिवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी पालिकेसह नेवासा नगर परिषदेचा समावेश होता. याआधी 2 डिसेंबरला आठ तर 20 डिसेंबर रोजी चार अशा मतदान झालेल्या 12 पालिकांसाठी रविवारी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी होणार असून निकालाचे चित्र दुपारी 1 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. मोठ्या खंडानंतर जिल्ह्यातील पालिकांना आज नवे कारभारी मिळणार आहेत.

- Advertisement -

निकालात कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. रविवारी संगमनेर, राहुरी, श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा, श्रीगोंदा, जामखेड आणि राहाता पालिकेसाठी सकाळी मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. यातील चार ठिकाणी काल मतदान झालेले असून उर्वरित आठ ठिकाणी 2 तारखेला मतदान झाले होते. तेव्हापासून तेथील मतदान यंत्रे सुरक्षीत ठेवण्यात आली होती. या ठिकाणी निवडणूक यंत्रणेसह राजकीय पक्षाचा खडा पहारा होता.

YouTube video player

संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा या सहा पालिकांमध्ये महायुतीत अंतर्गत मतभेद आणि पक्षातील गटबाजी स्पष्ट दिसून आली. भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) स्व बळावर असल्याने मतविभाजनाचा फटका महायुतीला बसणार का? राहाता व शिर्डी या ठिकाणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी महायुती ठवेली. संगमनेरमध्ये आमदारकीची पहिलीच टर्म असलेले आमदार अमोल खताळ यांना माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजीत तांबे यांनी आव्हान उभे केले. श्रीरामपूरमध्ये पहिल्यांदा आमदार झालेले आ. हेमंत ओगले यांची प्रतिष्ठापणाला असून त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस स्व बळावर निवडणुकीला समोरे जात आहे. राहुरी पालिका निवडणुकीत भाजप विरोधात दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी अशी लढत होती.

शेवगाव पालिका निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना हे महायुतीचे तिन्ही पक्ष समोरसमोर होते. तर या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाही नशीब अजमावत होता. या ठिकाणी भाजपचे नेतृत्व आ. मोनिका राजळे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेतृत्व माजी आमदार चंद्रशेखर घुले करत होते. जामखेडमध्ये विधान परिषदेचे सभापती आ. राम शिंदे व आ. रोहित पवार या दोघांची प्रतिष्ठापणाला असून विधानसभेत झालेला पराभवाचा वचपा या निवडणुकीत काढणार का हे पाहणे महत्वाचे आहे. श्रीगोंदा पालिकेत देखील पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर आ. विक्रम पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली पालिका निवडणूक झाली. या ठिकाणी महायुतीमधील तिन्ही पक्ष आमनेसामने उभे होते.

पालकमंत्री व भाजपचे निवडणूक प्रभारी राधाकृष्ण विखे यांनी या पालिका निवडणुकीत संपूर्ण किल्ला लढविला. शिर्डी मतदारसंघातील राहाता व शिर्डी या दोन पालिकांच्या निवडणुकीसह जिल्ह्यातील सर्व पालिकांच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेत सर्वांना मदत केली. विशेष म्हणजे मंत्री विखे यांनी भाजपसह मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना पाठबळ दिले आहे. संगमनेर व नेवासा या दोन्ही पालिकांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना त्यांनी पाठबळ दिले.

पालकमंत्र्यांसह आमदारांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीमध्ये फुट पडल्याचे दिसून आले. यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक पालिकांमध्ये भाजपने उमेदवार उतरवले. त्याखालोखाल अन्य पक्षासोबत स्थानिक आघाड्यांचा समावेश होता. या निवडणुकीत नगरच्या पालकमंत्र्यांसह सहा आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आज दुपारपर्यंत या शहरांतील मतदारांनी कोणाला कौल दिला हे स्पष्ट होणार आहे. तसेच सत्ताधारी महायुतीत कोणता पक्ष सरस ठरला हे देखिल स्पष्ट होणार आहे.

प्रत्येक पालिकेत गणित वेगळे
जिल्ह्यातील 11 नगर परिषद व एका नगर पंचायतीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम 4 नोव्हेंबरला जाहीर झाला होता. या निवडणुकीत 12 नगराध्यक्षपदासाठी 86 तर 289 नगरसेवकपदांसाठी 1 हजार 274 उमेदवार रिंगणात असल्याने बहुतांशी ठिकाणी रंगतदार लढती झाल्या. नगराध्यक्षांची थेट निवडणूक असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तपाले होते. निवडणुकीत प्रत्येक पक्षाने संबंधीत पालिकेचा मतदारसंघ पिंजून काढण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील प्रत्येक पालिका हद्दीत वेगवेगळी राजकीय समीकरणे असल्याने या ठिकाणी कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सभा-मिरवणुकीस बंदी
मतमोजणीची प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी 18 ते 22 डिसेंबर या कालावधीत विशेष आदेश जारी केले आहेत. संबंधित कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. कोणत्याही सार्वजनिक किंवा रस्त्यालगतच्या ठिकाणी विनापरवाना वाद्ये, ढोल-ताशे, कर्कश संगीत वाजविण्यास किंवा गाणी म्हणण्यास, सार्वजनिक ठिकाणी किंवा उपहारगृहांच्या आसपास विनापरवाना ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. सभा घेण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

पालिका दृष्टीक्षेपात
नगरपरिषदा- 11 नगरपंचायत – 1
12 नगराध्यक्षपदाचे एकूण उमेदवार – 86
289 नगरसेवकपदाचे एकूण उमेदवार-1 हजार 274

येथे होणार मतमोजणी
संगमनेर – बॅडमिंटन हॉल, क्रीडा संकुल
राहाता – नगरपालिका प्रशासकीय इमारत
राहुरी- लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय
शिर्डी- श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था
श्रीरामपूर- मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला,
शेवगाव- तहसील कार्यालय
श्रीगोंदे- धान्य गोडावून, पेडगाव रस्ता
जामखेड- श्री नागेश्वर सभागृह
पाथर्डी- नगरपालिका कार्यालय
देवळाली प्रवरा- समर्थ बाबूराव पाटील बहुउद्देशीय सभागृह
नेवासे- तहसील कार्यालय
कोपरगाव- सेवानिकेतन स्कूल

चार पालिकांसाठी सरासरी 70 टक्के मतदान

कोपरगावात भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत हाणामारी || नेवासेत एक ताब्यात || श्रीगोंद्यात राडा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर जिल्ह्यातील कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, देवळाली प्रवरा या चार पालिकांसाठी तसेच सात पालिकामधील 12 नगरसेवकांच्या जागांसाठी शनिवारी सायंकाळपर्यंत सरासरी 70 टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आला. सायंकाळी सातनंतर अनेक ठिकाणी मतदारांनी रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला. शनिवारी कोपरगाव पालिकेसाठी 68.16 टक्के, पाथर्डी पालिकेसाठी 68.76 टक्के, देवळाली प्रवरा पालिकेसाठी 77.07 टक्के तर नेवासा पालिकेसाठी 78.6 टक्के मतदान झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

कोपरगावात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोन्ही बाजूंचे प्रतिनिधी एकमेकांना भिडल्याने आणि पोलिसांशीही शाब्दिक चकमक झाल्याने काही काळ तणाव होता. नेवासे शहरातील प्रभाग क्रमांक 13(1) मध्ये तरूणाला बोगस मतदान करताना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर कारवाईची प्रक्रिया चालू होती. देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. श्रीगोंदा तालुक्यातील एका नगरसेवक पदाच्या निवडणुकीवेळी बोगस मतदानावरून राडा झाला.

यापूर्वी 2 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील आठ पालिकांसाठी सरासरी 72 टक्के मतदान झाले होते. तर निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार कोपरगाव, देवळाली प्रवरा आणि पाथर्डी पालिकेसह नेवासा नगरपरिषदेसाठी शनिवारी मतदानाची प्रक्रिया पारपडली. या सर्व ठिकाणी सुरूवातील मतदानाचा वेग मंद होता. सकाळी 7. 30 ते 9.30 या सुरूवातीच्या दोन तासात अवघे 7 टक्के मतदान झालेले होते. सकाळी 11. 30 पर्यंत मतदानाची ही आकडेवारी 18.45 टक्क्यांवर गेली. दुपारी दीड वाजता 33.23 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर दुपारी साडेतीनपर्यंत 50.25 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. चार पालिकांसह 12 नगरसेवकांच्या जागांसाठी 81 हजार 962 पुरुष तर 83 हजार 714 महिला मतदारांपैकी 83 हजार 262 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सायंकाळी साडेपाच नंतर अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू असल्याने जिल्ह्यात अंदाज 70 टक्क्यांच्या जवळपास मतदान झाले होते.

श्रीगोंदा पालिकेच्या प्रभाग सात ब या जागेसाठी मतदानावेळी छाया वनपुरे या महिलेच्या नावाने बोगस मतदान करताना एक मुलगी प्रशासनाने ताब्यात घेतली. यावरून भाजप आणि शिवसेना पदाधिकार्‍यांमध्ये तुफान राडा झाला. याच दरम्यान दोन तरुण मतदान केंद्रात विनाकारण फिरत असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. शिवसेनेचे बाळासाहेब दुतारे, उमेदवार मनोहर पोटे आणि भाजपचे शहराध्यक्ष धनंजय कोथिंबीरे यांच्यात तुफान राडा झाला. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. पोलिसांनी बोगस मतदानाचा प्रयत्न करणार्‍या मुलीला ताब्यात घेतले.

यानंतर शिवसेनेचे उमेदवार राहिलेले सुशील शिंदे आणि दुसरे उमेदवार पती दिपक मखरे हे देखील मतदान नसताना या मतदान केंद्राच्या आत फिरत असल्याने त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. उशिरापर्यंत बोगस मतदानप्रकरणी व अन्य दोघांवर कारवाईचे काम चालू होते.दरम्यान, मतदान केंद्रात बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणार्‍यांचा डाव हाणून पाडला. या प्रभागात मतदान नसलेले अनेक तरुण दहशत करण्यासाठी आणले होते. आमच्या हस्तक्षेपानंतर त्यांना पोलिसांनी बाहेर काढले, असे भाजपचे शहराध्यक्ष धनंजय कोथिंबीरे यांनी सांगितले.

मतदान घडवून आणण्यासाठी चढाओढ
दरम्यान, कोपरगाव, पाथर्डी, देवळाली प्रवरा आणि नेवासा या ठिकाणी निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाकडून आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना मतदान करून घेण्यासाठी चढाओढ दिसून आली. आता मतदान झाले असून मतदार राजाने दिलेला कौल काय हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.

पालिकेसाठी मतदान
कोपरगाव -68.16
पाथर्डी – 68.76
देवळाली प्रवरा-77.07 टक्के
नेवासा- 78.6 टक्के

प्रभागांसाठी मतदान
राहुरी – 58.79
संगमनेर – 72
श्रीरामपूर – 49
जामखेड – 75.12
शेवगाव – 68
श्रीगोंदा – 78

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 1400 रुपये भाव मिळाला. कांद्याची 3634 गोण्यांची आवक झाली. कांदा...