Wednesday, September 23, 2026
HomeनगरAhilyanagar : नगर जिल्ह्याला पीएमएफएमई योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार

Ahilyanagar : नगर जिल्ह्याला पीएमएफएमई योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार

अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीत उत्कृष्ट कामगिरीची केंद्र सरकारकडून दखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार मिळाला आहे. भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे 24 व 25 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय ‘पीएमएफएमई कॉन्क्लेव्ह’मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

- Advertisement -

यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय सचिव अविनाश जोशी, सहसचिव देवेश देवाल तसेच कृषी संचालक विजयकुमार आवटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत नगर जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 855 अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आले आहेत. जिल्हा कृषी विभागाने केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीची केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर दखल घेत जिल्ह्याचा गौरव केला आहे. पुरस्कारांच्या वर्गवारीत महाराष्ट्र राज्याचा देशात प्रथम क्रमांक येण्यात नगर जिल्ह्याचा मोलाचा वाटा राहिला आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाभार्थ्यांना सरासरी 11.68 लाख रूपयांचे प्रकल्प कर्ज मिळाले असून, सरासरी 4.27 लाख रूपयांचे अनुदान देण्यात आले आहे. जिल्ह्यातील अन्न प्रक्रिया उद्योगांना आतापर्यंत तब्बल 79 कोटी रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोराळे यांनी सांगितले की, जिल्ह्यात जास्तीत जास्त उद्योजक तयार करून तरूणांसाठी रोजगाराच्या संधी जिल्ह्यातच उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना मिळाल्याने स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीबरोबरच शेतमालाला प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून अधिक मूल्य मिळण्यास मदत होत आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व बँका, कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच जिल्हा संसाधन व्यक्तींनी संघभावनेने काम केले. याच सामूहिक प्रयत्नांमुळे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत अहिल्यानगर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आणि केंद्र शासनाच्या स्तरावर राष्ट्रीय पुरस्कार मिळविला.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 305 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 4734 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर...