अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पडणार्या पावसात 40 दिवसांपेक्षा अधिकचा खंड पडला आहे. जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत गेल्या चार महिन्यांत अवघा 22 दिवस पाऊस झालेला आहे. यातील 12 दिवस एकट्या जुलै महिन्यांतील आहेत. खंड पडलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादन्नात 60 टक्क्यांपेक्षा अधिक घट येण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात खरीप हंगामातील विविध शेतात करपली असून जवळपास संपूर्ण राज्यच कोरड्या दुष्काळाच्या गर्तेत दिसत आहे. या पुढील काळात धो-धो पाऊस झाली तरी त्याचा खरीप हंगामातील पिकांना फारसा उपयोग होणार नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, नगर जिल्ह्यातील 131 महसूल मंडळापैकी सर्वाधिक 57 महसूल मंडळात 31 ते 40, 51 महसूल मंडळात 30 ते 21 आणि 20 मंडळात 15 ते 20 दिवसाचा पावसाचा खंड आहे. तर राज्यात कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा सलग 20 ते 43 दिवसांचा खंड आहे. खरीप पिकांना पाण्याचा हा दीर्घ ताण असह्य असल्याने तसेच सरासरी तापमानात वाढ झाल्याने सोयाबीन व तत्सम 90 ते 110 दिवसांची पिके करपायला लागली असून, तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीची कापूस व तत्सम पिकांची वाढ खुंटली आहे. बहुतांश पिकांच्या नुकसानीची तीव्रता 35 ते 90 टक्क्यांवर पोहोचल्याने तसेच पाण्याअभावी रब्बी हंगाम व फळबाग संकटात सापडण्याची शक्यता बळावल्याने संपूर्ण राज्य कोरड्या दुष्काळाच्या गर्तेत आहे. नगर जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामाच्या घटनार्या उत्पादनाचा अंदाज काढण्याच्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत. यात प्रथमदर्शनी नगर जिल्ह्यात खरीप हंगामातील 60 टक्क्यांपेक्षा अधिक पिके पावसाअभावी वाया गेली असून ही पिके ऐन फुलोर्यात असतांना त्यांना पाण्याचा ताण बसला. आता किती पाऊस झाला तरी फलोर्याचा हंगाम परत येणार नसल्याने या पिकांचे दिर्घकालीन नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
एल निनोचे वर्ष असल्याने पावसाची अनियमितता आणि दीर्घ खंड विचारात घेत मागील वर्षीपासून नियोजन व उपाययोजना करणे अत्यावश्यक असताना याकडे लक्षच दिले नाही. यावर्षी सुरुवातीला व मध्यंतरी काही भागात चांगला पाऊस झाला असला तरी कमी दिवसांत अधिक पाऊस येऊन गेला. शिवाय, पावसाचे वितरणही अनियमित राहिल्याने या पावसाचा पिकांना दीर्घ काळ फायदा झाला नाही व जमिनीतील पाण्याची पातळी देखील वाढली नाही. परिणामी नगरसह राज्यातील अन्य भागात सोयाबीन व कमी कालावधीची पिके करपली. तर कापूस, तूर व दीर्घ कालावधीच्या पिकांची वाढ खुंटली आहे.
यंदाच्या पावसाळ्यातील चार महिन्यांत जिल्ह्यात आतापर्यंत 22 दिवस पाऊस झालेला आहे. मागील वर्षी जिल्ह्यात 585.9 मि.मी. पाऊस झालेला असतांना यंदा तो अवघा 257.3 म्हणजे आतापर्यंतच्या पावसाच्या सरासरीच्या 58 टक्के झालेला आहे.
विभागनिहाय पावसाचा खंड
नाशिक- 26 ते 44 दिवस, पुणे- 35 ते 43 दिवस, छ. संभाजीनगर 30 ते 39 दिवस, अमरावती 21 ते 42 दिवस, नागपूर 18 ते 27 दिवस असा आहे.
40 दिवस पाऊस नसणारी मंडळ
चास, रुईछत्तीशी, वाळकी, कर्जत, कोंभळी, कुळधरण, माहिजळगाव, मिरजगाव, राशीन, कोरेगाव, अकोले, ब्राह्मणवाडा, साकीरवाडी, समशेरपूर, विरगाव, पाटोदा, पोहेगाव, दहिगाव बोलका, नेवासा बुद्रुक, सलाबतपूर, प्रवरासंगम, आळकुटी, भाळवणी, जवळा, कानूरपठार, पळशी, पळवे खुर्द, खरवंडी, कोरडगाव, राहुरी, टाकळीमिया, संगमनेर, धांदरफळ, शिबलापूर, तळेगाव, साकुर, निमोण, नांदूर खंदरमाळा, श्रीरामपूर, शेवगाव बोधेगाव, दहिगावने, मुंगी, श्रीगोंदा, कोळगाव, काष्टी, लोणी व्यंकनाथ, मांडवगण, बेलवंडी यांचा समावेश आहे.
30 दिवस पाऊस नसणारे मंडळ
भातकुडगाव, एरंडगाव, बेलापूर, उंदीरगाव, कारेगाव, टाकळीभान, आश्वी, समनापूर, घारगाव, डोळासणे, पिंपळने संगमनेर खुर्द, सात्रळ, ताराहाबाद, देवळाली प्रवरा, ब्राह्मणी, वांबोरी, बारागाव नांदूर, राहाता, शिर्डी, लोणी, बाभळेश्वर, पुणतांबा, अस्तगाव, अकोले, माणिकदोंडी, टाकळीमानूर, तिसगाव, पारनेर, कुकाणा, सोनई, वडाळा, कोकमठाण, कोपरगाव, रवंदे, सुरेगाव, अरणगाव, नान्नज, नायगाव, साकत, राजुर, शेंडी, कोतुळ, वाळकी, रूभोडी, भांबोरा, खेड, वालवड, कापूरवाडी, नेप्ती आणि केडगाव यांचा समावेश आहे.
20 दिवस पाऊस नसणारी मंडळे
नालेगाव, सावेडी, भिंगार, नागापूर, जेऊर, चिचोंडी, लिंगदेव, जामखेड, चांदा, देडगाव, नेवासे खुर्द, भानसहिवरे, निघोज, वाडेगव्हाण, करंजी, मिरी, पाथर्डी, घुलेवाडी, चापडगाव ढोरजळगाव यांचा समावेश आहे.
धरण पाणलोटात दमदार पाऊस
जून महिन्यात 6, जुलै महिन्यात 12, ऑगस्ट महिन्यात 3 आणि चालू सप्टेंबर महिन्यात एक अशा 22 दिवस पावसाची नाेंंद झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. याच काळात जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील मोठ्या धरणात समाधानकारक पाऊस झाला. तसेच जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा झाल्याने नाशिक, नगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याचा विषय संपला.




