राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
अहिल्यानगर जिल्ह्यात 4 नोव्हेंबरपर्यंत अल्प पावसाची हजेरी राहाणार असल्याचा अंदाज जलसंपदा चे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा हवामान अभ्यासक उत्तमराव निर्मळ यांनी व्यक्त केला आहे. याबाबत श्री. निर्मळ पुढे म्हणाले, अर्णब चक्रीवादळ उत्तरेकडे गेले असले तरी चक्रीवादळाच्या बाहेरील बाजुचे बाष्पयुक्त ढग अहिल्यानगरसह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात विखुरले गेले आहेत. या चक्रीवादळाची चक्राकार गती ताशी जवळपास 130 ते 140 किलोमीटरपर्यंत होती. त्यामुळे या बाष्पयुक्त ढगांच्या व्याप्तीचा परीघ 700 ते 800 किलोमीटर पर्यंत होता. सध्या बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाची प्रणाली तयार होत असुन 2 नोव्हेंबरच्या दरम्यान तिचे चक्रीवादळात रुपांतर होईल. हे चक्रीवादळ 2 ते 3 नोव्हेंबरच्या दरम्यान आंध्रप्रदेशातील विजयवाड्यानजीक किनारपट्टीला धडकेल. या चक्रीवादळाची चक्राकार गती ताशी 90 ते 100 किलोमीटर असल्याने अर्णब चक्रीवादळाच्या तुलनेत ते फारच सौम्य असेल. अहिल्यानगरसह महाराष्ट्रासाठी या चक्रीवादळाचा फारसा फायदा नसला तरी सध्या जे ढगाळ वातावरण आहे ते 4 नोव्हेंबरपर्यंत टिकुन राहाण्यास मदत होईल.
वातावरणातील बाष्पयुक्त ढगांमुळे स्थानिक वातावरण तयार होऊन अहिल्यानगरसह बहुतांश भागात विखुरलेल्या भागात 4 नोव्हेंबरपर्यंत अल्प ते हलक्या स्वरुपात पर्जन्यवृष्टी होईल. परंतु ती सर्वदुर असणार नाही. ज्या ठिकाणी ही पर्जन्यवृष्टी होईल ती उभ्या पिकांना काही दिवसासाठी अंशतः जीवदान देईल. परंतु सर्व भागात हा पाऊस होणार नसल्याने दुष्काळाची तिव्रता कमी होईल अशी परिस्थिती नाही. हा पाऊस पुरेसा नसल्याने रब्बी पिकांच्या पेरणीसाठी फारसा उपयुक्त असणार नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोरडवाहू भागातील रब्बी हंगाम सुध्दा पुर्णतः धोक्यात आला आहे. उभी पिके तसेच थोड्याफार प्रमाणात ज्या पेरण्या झाल्या आहेत त्या करपुन गेल्या आहेत. मुळा आणि प्रवरा कालव्यांची सुरु असलेली आवर्तने नुकतीच संपलेली असुन रब्बी पिकांना त्याचा मोठा आधार मिळाला आहे.
परंतु गोदावरी कालवे तसेच निळवंडे कालव्यांची आवर्तने संपुन जवळपास दिड – दोन महिन्याचा कालखंड झाला असल्याने उभ्या असलेल्या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. अपुर्या पावसामुळे भुजलपातळी वाढली नाही. त्यामुळे भर पावसाळ्यात काही विहिरी कोरड्या पडल्या आहे आणि सांगळ्यावर आलेल्या विहिरी येत्या पंधरवड्यात तळ गाठतील. त्यामुळे रब्बी पिकांचे भवितव्य पुर्णतः कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात पाणी मिळाले तरच रब्बी पिके विशेषतः चारा पिके तग धरतील. अन्यथा पाण्याअभावी सर्व पिके हातातून जातील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आवर्तनाचा जो कार्यक्रम ठरला असेल त्याचे पुनर्विलोकन करुन रब्बी पिकांना किमान संरक्षित पाणी मिळेल असे सुधारीत नियोजन करावे अशी लाभधारकांची तिव्र मागणी आहे. जलसंपदा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन याबाबत तातडीने फेरनियोजन करावे ही सार्वत्रिक भावना आहे.




