अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दीर्घ विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे. पुण्यासह राज्यातील विविध भाग, अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भाग (श्रीगोंदा, कर्जत, जामखेड) आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांचा बराचसा भाग व्यापत मान्सूनने पुढे वाटचाल केली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली असून, पेरण्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात आजपासून तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात 22 ते 26 जून या कालावधीत तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात रविवारपासून वातावरणात लक्षणीय बदल झाला असून, दिवसभर कडाक्याच्या उन्हानंतर दुपारी चारनंतर अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागत आहे. 14 दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून सक्रियमान्सूनने तब्बल 14 दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर महाराष्ट्रात वेगाने प्रगती केली आहे.
सोमवारी मान्सूनने कोकणातील रत्नागिरी जिल्हा ओलांडून रायगडच्या अलिबागपर्यंत, तर मध्य महाराष्ट्रात सातारा आणि सोलापूर जिल्हे ओलांडून पुणे जिल्ह्यातील मावळ-मुळशीपर्यंत मजल मारली. तसेच दक्षिण अहिल्यानगरमधील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेडचा बराचसा भाग मान्सूनने व्यापला आहे. दुसरीकडे, मान्सूनच्या अरबी समुद्रीय शाखेने तेलंगणा राज्यातून दक्षिण विदर्भातील गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यापर्यंत धडक दिली आहे. पुढील 2-3 दिवसांत मुंबईसह उर्वरित महाराष्ट्र व्यापणारमान्सून पोहोचलेल्या सर्वच ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस झाला नसला, तरी मान्सूनचे वारे तिथपर्यंत पोहोचले आहेत. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी वातावरण अत्यंत अनुकूल असून, येत्या 2 ते 3 दिवसांत मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून पुढे झेपावेल अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
वातावरणातील महत्त्वाचे बदल
पावसाळी हंगामात समुद्रसपाटीच्या पातळीत स्थिरावणारा हवेच्या कमी दाबाचा पूर्व-पश्चिम आस काहीसा दक्षिणेकडे सरकला आहे. सोमवारी तो पंजाब, हरियाणाऐवजी राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश राज्यातून जात आहे. तसेच वायव्येकडून वाहणार्या उष्ण वार्यांचा जोर आता ओसरला आहे. यामुळे अरबी समुद्रात साडेतीन ते पावणेचार किमी दरम्यान असणारी प्रत्यावर्ती वार्यांची प्रणाली विरळ झाली आहे. यामुळे मान्सूनी वार्यांना बळकटी मिळाली असून महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास सुरू झाला आहे.
भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस
मुळा पाणलोटातही हजेरी
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
उत्तर नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण परिसरा आणि पाणलोटातील काही भागात काल सलग तिसर्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे या भागातील शेतकरी आनंदला आहे. एरव्ही जुलैमध्ये भंडादरार पाणलोटात जोरदार पाऊस बरसत असतो. पण यंदा जून संपत आला तरी पावसाचे आगमन झाले नव्हते. त्यामुळे पाणलोट आणि लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण होते. पण शनिवार, रविवार आणि सोमवारीही पाऊस कोसळला.
रविवारी सायंकाळी पावसास सुरूवात झाली. साडे पाच वाजण्याच्या सुमारास पाऊस तासभर कोसळत होता. काल सोमवारीही दुपारी 4 ते 5.30 वाजेपर्यंत जोरदार पाऊस कोसळला. त्यानंतरही अधून मधूनही सरी कोसळत होत्या.
काल सकाळी नोंदविल्या गेल्यानुसार भंडारदरात 11, घाटघर 16, पांजरे 18, रतनवाडीत 31 आणि वाकीत 11 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धणात काल सायंकाळी 2359 दलघफू (21.37टक्के) पाणीसाठा होता. तर निळवंडेत 1562 (18.74टक्के) पाणीसाठा होता.
मुळा पाणलोटातही हजेरी
कोतूळ वार्ताहराने कळविले की, मुळा धरणाच्या पाणलोटातील अकोले तालुक्यातील हरिश्चंद्र गड, पाचनई, कोतूळ भागात काल दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. त्यामुळे भातरोपांना जीवदान मिळाले आहे.




