अहिल्यानगर (प्रतिनिधी)
अहिल्यानगर शहर व जिल्ह्यात ड्रग्ज व इतर अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे युवक वर्ग नशेच्या आहारी जात असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी शेकडो कार्यकर्ते व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह शुक्रवारी (6 फेब्रुवारी) पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट देत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन दिले. ड्रग्ज तस्करीविरोधात तात्काळ व कडक कारवाई करावी, अन्यथा पोलीस प्रशासनाविरोधात मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
आ. जगताप म्हणाले, पोलिसांनी छापा टाकून जप्त केलेले ड्रग्ज पोलिसानेच विक्री केल्याची बाब समोर आली. पुणे पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला. हा गंभीर प्रकार नगर पोलिसांच्या लक्ष्यात आला नाही. ड्रग्जच्या वाढत्या उपलब्धतेमुळे युवकांकडून नशेच्या अधीन राहून विविध गैरकृत्ये घडत असून समाजस्वास्थ्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. ड्रग्ज पुरवठा करणार्यांबाबत पोलीस प्रशासनाला माहिती मिळत असूनही त्यावर अपेक्षित ती ठोस कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
नुकतीच जिल्ह्यात ‘एमडी’ ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतर ही कारवाई वादाच्या भोवर्यात सापडल्याने मूळ पुरवठादारांपर्यंत पोलीस पोहोचू शकले नाहीत, अशा तक्रारी नागरिकांकडून पुढे येत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीच्या काळात बोल्हेगाव परिसरातील आठ युवकांनी ड्रग्जचे अति सेवन केल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करावे लागले होते. मात्र याविषयी देखील पोलीस प्रशासनाकडून ठोस दखल घेण्यात आली नाही, ही अत्यंत गंभीर व दुर्दैवी घटना असल्याचे आ. जगताप यांनी सांगितले.
युवकांमध्ये वाढलेल्या बॉडीबिल्डिंग क्रेझच्या पार्श्वभूमीवर अनेक जिममध्ये स्टेरॉईडच्या नावाखाली नशेची इंजेक्शने दिली जात असल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात येत असल्याचे नमूद करण्यात आले. यापूर्वी अशा इंजेक्शनचा मोठा साठा जप्त केला असला तरी अद्यापही ही इंजेक्शने सहज उपलब्ध होत असल्याने केलेल्या कारवाईतून समूळ उच्चाटन झाले नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
…………………………………….
पोलिसांना आव्हान, तरी कारवाई नाही
काही तरूण मुले विनानंबरच्या दुचाकीचा वापर करून ट्रिपल सिटी फिरतात. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील सिंग्नल तोडून पोलिसांना आव्हान दिले जाते. तरी देखील पोलिसांकडून कारवाई होत नाही. महाविद्यालय, शाळांच्या परिसरांमध्ये पोलिसांकडून गस्त वाढवावी व अशा विना नंबरच्या दुचाकी वाहनांवर कारवाई करावी, ड्रग्ज व ड्रग्ज पुरवठादार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आ. जगताप यांनी यावेळी केली.





