Thursday, July 23, 2026
Homeनगरकर्जमाफीत अहिल्यानगर जिल्ह्यात १२०० कोटींच्या लाभाची शक्यता

कर्जमाफीत अहिल्यानगर जिल्ह्यात १२०० कोटींच्या लाभाची शक्यता

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांना ५० हजारपर्यंत अनुदान मिळणार होते. त्यांना आता पूर्ण दोन लाख कर्जमाफी मिळणार असल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेमुळे जिल्ह्यात कर्जमाफी मिळणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार असून सुमारे १ हजार २०० कोटींपर्यंत जिल्हा सहकारी बँकेच्या खातेदारांना ही कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. दरम्यान १ लाख ९२ हजार ५९४ खातेदार शेतकऱ्यांची यादी अपलोड झाली असून ते सर्वांनाच आता या नव्या घोषणेमुळे लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

थकबाकीदार व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीसाठी २० हजार ५५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार कर्जमाफी योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येणार होते. यात थकीत कर्ज असणाऱ्यांना २ लाख तर नियमित कर्ज भरणाऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्यात येणार होते. मात्र, आज विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली. यामुळे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची वाढणार आहे.

यापूर्वी २०१९ मध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्यात येणार होते. त्यांना ही आता मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे दोन लाख कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, कर्जमाफीसाठी नगर जिल्हा बँकेचे २ लाख १७ हजार खातेदारांच्या खात्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीतून १ लाख ९२ हजार ५९४ खातेदार हे दोन लाखांच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आले होते.

यात दोन लाखांहून अधिक व दोन लाखांपेक्षा कमी रक्कम असे सर्वच पात्र खातेदारांचा समावेश आहे. यातून कर्जमाफीसाठी १ लाख ९२ हजारांहून अधिक कर्जदार शेतकर्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहेत. या पात्र शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी सुरू असतांना आता सरकारने नियमित कर्जफेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांऐवजी सरकट २ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केलेली आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता ५०० ते ६०० कोटीऐवजी १ हजार २०० कोटीपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तालुकानिहाय पात्र लाभार्थी

श्रीगोंदा ४१ हजार ४५८, नेवासा २६ हजार २२७, अकोले १० हजार ४८३, जामखेड ९ हजार ६३४, कर्जत १२ हजार ३२३, कोपरगाव ३ हजार ९६०, नगर ९ हजार ४३३, नेवासा २६ हजार २२७, पारनेर ९ हजार ४९०, पाथर्डी ८ हजार ९२३, राहुरी १६ हजार ३६८, राहाता ६ हजार ७३३, शेवगाव १५ हजार ७५३, संगमनेर ११ हजार १०४, श्रीगोंदा ४१ हजार ४५८, श्रीरामपूर १० हजार ७०५.

ताज्या बातम्या

नाशिक रिंगरोड प्रकरणी उच्चस्तरीय समिती गठीत

0
मुंबई | उद्धव ढगे पाटील Mumbai नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या संरेखनाची (अलाइनमेंट) तसेच रिंग रोडमध्ये झालेल्या जमीन खरेदी...