Wednesday, October 21, 2026
HomeनगरAhilyanagar : अहिल्यानगर शहरात ऑलआऊट, कोंबीग ऑपरेशन

Ahilyanagar : अहिल्यानगर शहरात ऑलआऊट, कोंबीग ऑपरेशन

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गुन्हेगारांवर वॉच

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहर पोलिसांकडून गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ऑलआऊट व कोंबीग ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 122 अन्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले, तर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये सहा गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच जामीनपात्र वॉरंटमधील 20 आरोपींवर अटकेची कायदेशीर कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

अहिल्यानगर शहर उपविभागातील कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रविवारी (23 ऑगस्ट) रात्री 11 ते सोमवारी (24 ऑगस्ट) पहाटे पाच वाजेपर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. ऑलआऊट व कोंबीग ऑपरेशनदरम्यान संशयित तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. रात्रीच्यावेळी चोरीच्या उद्देशाने फिरणार्‍या दोघांविरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 122 अन्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले.

तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी या मोहिमेत 10 पाहिजे व फरारी आरोपींची तपासणी केली. त्याचप्रमाणे हद्दपार करण्यात आलेल्या सहा आरोपींची तपासणी करण्यात आली. हे आरोपी आढळून आले नाहीत. याशिवाय अजामीनपात्र 27 वॉरंटमधील आरोपींची तपासणी, तर जामीनपात्र वॉरंटमधील 20 आरोपींवर अटकेची कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. रेकॉर्डवरील सहा गुन्हेगारांचीही तपासणी करून त्यांच्याविरूध्द आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. या कारवाईत कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

आगामी काळातही शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवून अचानक कोंबीग, नाकाबंदी आणि ऑलआऊट ऑपरेशनच्या माध्यमातून कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे.
– डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस उपअधीक्षक, अहिल्यानगर शहर.

ताज्या बातम्या