Friday, November 20, 2026
Homeक्राईमAhilyanagar : नगरमध्ये सोने चोरी करून छत्रपती संभाजीनगरला विकले

Ahilyanagar : नगरमध्ये सोने चोरी करून छत्रपती संभाजीनगरला विकले

सोने खरेदी करणार्‍या दोघांसह चौघांना एलसीबीकडून अटक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील मातोश्री अपार्टमेंट परिसरात झालेल्या घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणात मध्यप्रदेशातील दोन संशयित आरोपींसह चोरीचा मुद्देमाल खरेदी करणार्‍या छत्रपती संभाजीनगर येथील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत 1 लाख 6 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विवेक मारोतराव साखरे (वय 64, रा. मातोश्री अपार्टमेंट, शिवनेरी चौक, अहिल्यानगर) यांच्या राहत्या घरातून 13 ऑक्टोबर रोजी चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक हरीष भोये, अंमलदार अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, शाहीद शेख, संदीप पवार, फुरकान शेख, मनोज साखरे, अमोल कोतकर, महादेव भांड यांचे पथक नियुक्त केले. पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. त्यावेळी हा गुन्हा मध्यप्रदेशातील कपील चंपालाल चावडा (वय 23, रा. पटवारी कॉलनी, बडवा, ता. महेश्वर, जि. खरगोण) याने साथीदाराच्या मदतीने केल्याची माहिती मिळाली. तो नेवासा फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

चौकशीत कपील चावडा याने राजा चेयनसिंग पटेल (वय 23, रा. जयमलपूरा, बडवा, ता. महेश्वर, जि. खरगोण) याच्या साथीने घरफोडी केल्याची माहिती दिली. चोरीच्या मुद्देमालापैकी काही दागिने राजा पटेल याच्याकडे असल्याचे, तर उर्वरित मुद्देमाल छत्रपती संभाजीनगर येथे विकल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी राजा पटेल याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 50 ग्रॅम वजनाचे चांदीचे बिस्कीट, एक मोबाईल, लोखंडी पान्हा आणि एक बॅग असा एकूण 1 लाख 6 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच चोरीचा मुद्देमाल खरेदी केल्याच्या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील अनिल रामनारायण तिवारी (वय 56) आणि भारत नानासाहेब जोशी (वय 32) यांनाही ताब्यात घेण्यात आले.

ताज्या बातम्या

संपादकीय : २० नोव्हेंबर २०२६ – शिक्षणसम्राटांच्या मनमानीला चाप

0
महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात सध्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयाची चर्चा सुरू आहे. तो म्हणजे राज्य सरकारकडून प्रस्तावित सुधारित शुल्क नियंत्रण कायदा. उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील...