अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर शहर आणि परिसरात एकाच दिवशी अपहरणाच्या चार वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. तीन युवतींसह एका तरूणाला अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांत दाखल झाल्या आहेत. या चारही प्रकरणांत अज्ञात व्यक्तींविरूध्द गुन्हे नोंदविण्यात आले असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
केडगाव येथील बालगृहातून 18 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी (19 ऑक्टोबर) दुपारी तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान घडली.
बालगृहाच्या अधीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यसात आला आहे. दुसरी घटना अहिल्यानगर येथील सिध्दार्थ अॅग्रो, मार्केट यार्ड परिसरात घडली. 22 वर्षीय विवाहित महिला सोमवारी (19 ऑक्टोबर) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या परिसरातून बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या पतीने कोतवाली पोलिसांत दिली आहे. अज्ञात व्यक्तीने पत्नीला अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
तिसरी घटना भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. उमेश मनोज दिवटे (वय 32, रा. हनुमंतगाव, चिखली, ता. आष्टी, जि. बीड) यांचे सोमवारी (19 ऑक्टोबर) सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान नटराज हॉटेलसमोरून अपहरण झाल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले. त्यानुसार भिंगार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौथी घटना नागापूर परिसरात घडली. 19 वर्षीय युवती सोमवारी दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता झाली. तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे.




