अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांच्या वीज बिलाच्या खर्चात बचत व्हावी, या उद्देशाने शहरात चार ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. राज्य शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पातून निर्मिती होणारी वीज तेथील प्रकल्पातच वापरली जाणार आहे. या माध्यमातून महानगरपालिकेची सुमारे 4 कोटी 20 लक्ष रूपयांची बचत होणार आहे. लवकरच हे प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी सौर ऊर्जा प्रकल्पाचा आढावा घेतला. शहरात राज्य शासनाच्या 10 कोटी व महानगरपालिकेच्या 2.70 कोटींच्या अशा 12.70 कोटींच्या निधीतून नालेगाव अमरधाम येथे 250 किलोवॅट, सावेडी कचरा डेपोच्या जागेत 300 किलोवॅट, बुरूडगाव कचरा डेपो 500 किलोवॅट, मलनिस्सारण प्रकल्प येथे 950 किलोवॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहे.
यात निर्मिती होणार्या वीजेचे वार्षिक 30 लक्ष युनिट संबंधित जागेतील प्रकल्पात खर्च होणार आहेत. त्यातून 4 कोटी 20 लक्ष रूपयांची वीज बिल बचत होणार आहे. सोलर पॅनल सिस्टीम उभारण्यात आली आहे. लवकरच ट्रान्सफॉर्मर बसवले जाणार आहेत. त्यानंतर हे चारही प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत. महानगरपालिकेने यापूर्वी शहरात अमृत अभियानांतर्गत आठ ठिकाणी सोलर पॅनल सिस्टीम उभारली आहे. त्याव्दारे 1650 किलोवॅट वीज निर्मिती केली जात आहे. महानगरपालिकेचा विविध प्रकल्पांवर होणार वीजबिलाचा खर्च मोठा आहे. या चार प्रकल्पांमुळे महानगरपालिकेच्या वीजबिलात बचत होणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी सांगितले.