अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगरच्या जिल्हा सहकारी बँकेवर मंगळवार (दि.5) रोजी सायंकाळी उशिरा प्रशासक नियुक्तीचे आदेश सहकार खात्याच्या वतीने काढण्यात आले. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात नियुक्त करण्यात आलेले प्रशासकांनी जिल्हा बँकेचा पदभार स्वीकारला. दरम्यान प्रशासक म्हणून जिल्हा विशेष लेखापरीक्षक गौतम निकाळजे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी पदभार स्वीकारताच तातडीने आज बुधवार (दि.6) रोजी बँक प्रशासनाची बैठक बोलावली आहे.
जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची फेबु्रवारी 2026 म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच मुदत संपली होती. त्यानंतर सत्ताधारी दिवंगत अजित पवार गटाचे चंद्रशेखर घुले पाटील यांच्याकडे चेअरमन पद कायम होते. सहकार खात्याने राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील सहकार विभागाच्या निवडणुका 31 मे पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश दिले होते. यामुळे जिल्हा बँकेसह जिल्ह्यातील तीन सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलल्याने बँकेवर प्रशासक म्हणून विद्यमान चेअरमन घुले यांच्याकडे पदभार कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत होती. विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून चेअरमन घुले पाटील हे बँकेचा गाडा हाकत होते. मात्र, मंगळवारी सायंकाळी अचानक विभागीय सहनिंबधक संभाजी निकम यांनी जिल्हा बँकेवरील प्रशासक नियुक्तीचे आदेश काढले.
या ठिकाणी नगरचे विशेष लेखा परीक्षक गौतम निकाळजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निकाळजे यांनी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता प्रशासक पदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर आज बुधवारी त्यांनी तातडीने जिल्हा बँकेची बैैठक बोलावली असून या बैठकीत ते बँकेच्या पूर्ण-अपूर्ण कामाचा प्राधान्यक्रम निश्चित करणार आहेत.
बँकेतील राजकीय स्थित्यांतर
पाच वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी आणि भाजपमधील शिवाजीराव कर्डिले गटाने एकत्र निवडणुकीत लढवत जिल्ह्यातील सहकारातील राधाकृष्ण विखे गटाचा पराभव करत बँकेवर सत्ता मिळवली होती. त्यावेळी थोरात गटाचे पहिले चेअरमन होण्याचा मान दिवंगत उदय शेळके यांना मिळाला होता. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांनी विजय मिळवला. त्यावेळी विखे गटाने त्यांना मदत केली. दरम्यान, राज्यात राष्ट्रवादीचे दोन गट झाले. त्यातील अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्याने जिल्हा बँक अप्रत्यक्षपणे विखे गटाच्या ताब्यात गेली. त्यानंतर कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे चंद्रशेखर घुले पाटील यांना चेअरमन होण्याची संधी मिळाली.
नवा कायदा ठरला अडचण
एप्रिल महिन्यांत सहकार कायद्यात झालेल्या बदलांचा फटका बँकेच्या विद्यमान पदाधिकार्यांना बसला आहे. नव्या कायद्यानूसार मुदत संपलेल्या सहकारी संस्थांवर सहकार खात्याने तातडीने प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश काढले होते. यामुळे जिल्हा बँकेवर तातडीने प्रशासक नियुक्त करण्याची वेळ आली. नवीन कायद्यातील तरतूदी नसत्यातर विद्यमान चेअरमन घुले पाटील यांना निवडणुकीपर्यंत प्रशासक म्हणून राहाता आले असते, असे सुत्रांनी सांगितले.
31 मे निवडणुकीचा मार्ग बंद ?
राहुरी व बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सहकार खात्याने आदेश काढत पुणे आणि नगर जिल्ह्यातील सहकार खात्याच्या निवडणुका पुढे ढकल्या होत्या. यासाठी 31 मेपर्यंतची मुदत असून या मुदतीपर्यंत विद्यामान प्रशासक यांना निवडणुकीबाबतचा कोणताच निर्णय घेता येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. साधारपणे पावसाळा संपल्यावर निवडणूक होण्याची शक्यता असल्याने बँकेवर प्रशासक राहणार आहे.





