अहिल्यानगर (प्रतिनिधी)
देऊळगाव सिध्दी (ता. अहिल्यानगर) शिवारात पिकअपच्या धडकेत तरूणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना अखेर खून असल्याचे उघड झाले आहे. अहिल्यानगर तालुका पोलिसांनी सुरूवातीला अपघात म्हणून नोंद घेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र फिर्यादीने थेट जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) चौकशीत हा अपघात नसून नियोजित खून असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, या प्रकरणामुळे अरणगाव येथील मिठू दत्त खून प्रकरणानंतरचा हा दुसरा धक्कादायक प्रकार समोर आल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तात्कालीन सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी खून दडपण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे.
दि. १९ जानेवारी २०२६ रोजी देऊळगाव सिध्दी शिवारात पियुष साखर कारखान्याजवळ संदीप ताराचंद लगड (बय ३२, रा. तांदळी वडगाव, ता. अहिल्यानगर) यांचा पिकअपच्या धडकेत मृत्यू झाला. सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नातेवाईकांनी मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगूनही पोलिसांनी रामदास ताराचंद लगड यांच्या फिर्यादीवरून ऋषिकेश बाळासाहेब घिगे व राजेंद्र रमेश घोंगडे (दोघे रा. वडगाव तांदळी) यांच्याविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला व अटकही केली.
मात्र फिर्यादी रामदास लगड व त्यांच्या नातेवाईकांचा संशय होता की हा अपघात नसून खून आहे. तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गीते यांनी खुनाच्या अनुषंगाने तपास करण्यास अनास्था दाखविल्याचा आरोप करण्यात आला. वारंवार पाठपुरावा करूनही दाद न मिळाल्याने अखेर फिर्यादीने अधीक्षक घार्गे यांच्याकडे तक्रार केली आणि तपास एलसीबीकडे देण्याची मागणी केली. अधीक्षक घार्गे यांनी एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना चौकशीचे आदेश दिले. दरम्यान गीते यांची राहुरी पोलीस ठाण्यात बदली झाली व तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांच्याकडे सोपविण्यात आला.
चौकशीत धक्कादायक बाबी समोर आल्या. १९ जानेवारी रोजी संदीप लगड, ऋषिकेश घिगे व राजेंद्र घोंगडे हे तिघे देऊळगाव सिध्दी ते वाकळी रस्त्यावरील हॉटेल जंगली येथे जेवणासाठी बसले होते. त्यांच्यात वाद झाल्यानंतर संदीप एकटाच पायी निघून गेला. त्यानंतर संगनमत करून दोघांनी पाठीमागून पिकअप त्याच्या अंगावर घातल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे गुन्ह्यात खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले असून पुढील तपास सहायक निरीक्षक वारूळे करीत आहेत.
निलंबन का नाही?
मिठू दत्त व संदीप लगड या दोन्ही प्रकरणांत खून झाल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले. मात्र दोन्ही वेळा खुनाचा गुन्हा दाखल का करण्यात आला नाही? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. थेट खून दडपण्याचा प्रकार उघडकीस येऊनही गीते यांच्यावर केवळ बदलीची कारवाई करण्यात आली. या संदर्भात अधीक्षक घार्गे यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. मात्र त्या चौकशीचे पुढे काय झाले? इतक्या गंभीर प्रकारानंतरही निलंबनाची कारवाई का करण्यात आली नाही? कोणाचा दबाव आहे का? अशी जोरदार चर्चा पोलीस दलात सुरू झाली आहे.
अरणगाव येथील मिठू दत्त यांना मारहाणीत गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मारहाणीत मृत्यू झाल्याचे पुरावे असूनही गीते यांनी खुनाचा गुन्हा दाखल न करता अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास स्वतःकडे ठेवला होता. जवळपास वर्षभर खुनाचा गुन्हा दाखल झाला नव्हता. या प्रकरणातही अधीक्षक घार्गे यांच्याकडे तक्रार झाल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आणि चौकशीतून दत्त यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर गीते यांची बदली करण्यात आली. आता देऊळगाव सिध्दी येथील संदीप लगड मृत्यूप्रकरणातही खून असल्याचे स्पष्ट झाल्याने गीते यांचा दुसरा कारनामा उघडकीस आल्याची चर्चा पोलीस दलात रंगली आहे. तालुका पोलीस ठाण्यात त्यांच्या कार्यकाळात इतरही गंभीर प्रकार घडल्याची चर्चा असून काहीजण वरिष्ठांकडे तक्रारी करत असल्याचे समजते.




