Thursday, June 11, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपुरातील गुन्ह्यात चेअरमन कुटेसह 10 संचालकांना अटक

Shrirampur : श्रीरामपुरातील गुन्ह्यात चेअरमन कुटेसह 10 संचालकांना अटक

‘ज्ञानराधा’ मल्टिस्टेट घोटाळा || सहा दिवसांची पोलीस कोठडी

श्रीरामपूर, अहिल्यानगर |प्रतिनिधी| Shrirampur, Ahilyanagar

बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या फसवणूक प्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना बुधवारी (10 जून) श्रीरामपूर न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सहा दिवसांची (16 जूनपर्यंत) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे (वय 48, रा. कुटेवाडी, ता. जि. बीड), संचालक यशवंत वसंतराव कुलकर्णी (वय 55, रा. कवडगाव, ता. वडवणी, जि. बीड), वसंतराव शंकरराव सटाले (वय 53, रा. पिंपळगाव, ता. माजलगाव, जि. बीड), वैभव यशवंत कुलकर्णी (वय 26, रा. कवडगाव), कैलास काशिनाथ मोहिते (वय 36, रा. जिरेवाडी, ता. जि. बीड), रवींद्र मधुकर तलबे (वय 40, रा. बीड), आशिष पद्माकर पाटोडेकर (वय 33, रा. पाटोदा, ता. जि. धाराशिव), रघुनाथ सखाराम खरसाडे (वय 40, रा. जिरेवाडी), रवींद्र श्रीरंग यादव (वय 52, रा. बीड), दादाराव हरीदास उंदरे (वय 55, रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ज्ञानराधा मल्टिस्टेटने आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारल्या होत्या. मात्र मुदत संपल्यानंतर ठेवी परत न मिळाल्याने ठेवीदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या प्रकरणी बीडसह विविध जिल्ह्यांत मिळून एकूण 98 गुन्हे दाखल आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातही श्रीरामपूर शहर व जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले असून दोन्ही गुन्ह्यांचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. श्रीरामपूर येथील गुन्ह्याचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ करण्यात आले असून जामखेड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात ‘मनीट्रेल’ तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, चेअरमन कुटे याच्यासह 10 जण जिल्हा कारागृह, बीड येथे न्यायालयीन कोठडीत होते. त्यांना अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात वर्ग करून घेतले आहे. त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता 16 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

47 कोटींची फसवणूक; 314 जणांचे जबाब नोंदविले
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सन 2024 मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. दरम्यान, तपास सुरू असताना गुन्ह्याचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्यानुसार फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात एकुण 47 कोटी रूपयांची फसवणूक झाल्याचे ऑडिटमधून समोर आले आहे. आतापर्यंत सुमारे 314 गुंतवणूकदारांचे जबाब नोंदविले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरीसह अन्य कृषी विद्यापीठांतील पद भरतीचा मार्ग मोकळा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 23 वर्षांनंतर विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता...