Friday, July 24, 2026
HomeनगरAhilyanagar : कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकर्‍यांची फसवणूक

Ahilyanagar : कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकर्‍यांची फसवणूक

लोकशाही, कांदा प्रश्नांवरून केंद्र आणि राज्य सरकारवर माजी मंत्री थोरात यांची टीका

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकर्‍यांना सरसकट दोन लाख रूपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली होती. मात्र सध्याच्या युती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही अपुरी असून त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. राज्यातील शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफीची गरज असताना केवळ घोषणाबाजी करण्यात आली आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

- Advertisement -

जिल्ह्यातील वाढते अवैध धंदे, कायदा-सुव्यवस्था आणि विविध जनतेच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण आदी उपस्थित होते. थोरात यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवरही जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाची तुलना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी करणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी नेहरूंच्या योगदानाचा उल्लेख केला.

स्वातंत्र्यलढ्यातील त्याग, लोकशाही संस्थांची उभारणी आणि देशाच्या विकासासाठी केलेल्या कार्यामुळे नेहरूंचे स्थान वेगळे असल्याचे ते म्हणाले. सध्याच्या काळात लोकशाही संस्थांवर दबाव वाढत असून सामान्य जनता आर्थिक आणि सामाजिक अडचणीत सापडली आहे. जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्या, हेच सत्ताधार्‍यांचे धोरण असल्याचा दावा करत त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दत्तात्रय पानसरे यांच्यावर दबावतंत्राचा वापर झाल्याचा आरोप केला.

काँग्रेस आणि विरोधी पक्षांना सध्या प्रतिकूल राजकीय परिस्थितीचा सामना करावा लागत असला तरी पक्ष आपल्या विचारधारेवर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात जनतेमध्ये बदलाची भावना वाढत असून 2029 मध्ये केंद्र आणि राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विविध शासकीय कार्यालयांच्या स्थलांतराच्या निर्णयांवरही थोरात यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सत्ताधार्‍यांच्या राजकीय सोयीसाठी नव्हे तर जनतेच्या हितासाठी आणि सुविधांसाठी कार्यालयांचे स्थलांतर झाले पाहिजे. जनतेला गैरसोय होणार असेल तर अशा निर्णयांना विरोध कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

अवैध धंद्यांमुळे जिल्ह्याची चिंता
अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा, अवैध वाहतूक आणि इतर बेकायदेशीर व्यवसाय वाढत असल्याची चिंता व्यक्त करत थोरात यांनी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी केली. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी राजकारणापलीकडे जाऊन जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे. अन्यथा जनतेचा रोष वाढून लोक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला.

कांदा उत्पादक शेतकरी वार्‍यावर
राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नावर बोलताना थोरात यांनी नाफेडच्या खरेदी धोरणावर टीका केली. सध्या नाफेडमार्फत फक्त नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदी केली जात असून इतर जिल्ह्यांतील शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे राज्यातील हजारो कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून शासनाने तातडीने सर्व जिल्ह्यांमध्ये कांदा खरेदी सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.

ताज्या बातम्या

विसर्ग

Nashik News: गंगापूरसह धरणांचा विसर्ग वाढला; नांदूरमध्यमेश्वरमधून सर्वाधिक ८२ हजार क्युसेक

0
नाशिक । प्रतिनिधीजिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विविध धरणांमधून शुक्रवारी (दि. २४) सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. गंगापूर धरणातून 13,932 क्युसेक वेगाने...