Sunday, May 24, 2026
Homeनगरअपहृत तरूणाच्या सुटकेसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला

अपहृत तरूणाच्या सुटकेसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

नगर तालुका परिसरात एका तरुणाच्या अपहरण प्रकरणात सुटका करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर संशयित आरोपींकडून अचानक हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या पोलिसांकडून माहितीनुसार, सचिन विजय कार्ले (रा. दहिगाव साकत, ता. जि. अहिल्यानगर) यांनी शुक्रवारी (२२ मे) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या दरम्यान नगर तालुका पोलीस स्टेशन येथे धाव घेत आपल्या भावाचे अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यांचा भाऊ आकाश विजय कार्ले (वय २७) याचे गुरुवारी (२१ मे) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी राहत्या घरातून जबरदस्तीने स्कॉर्पिओ गाडीत डांबून अपहरण केले होते. अपहरणकर्ते आकाशच्या मोबाईलवरून वारंवार फोन करून कुटुंबियांकडे ९० हजार रुपयांची खंडणी मागत होते. पैसे न दिल्यास आकाशचा खून करण्याची धमकीही आरोपींकडून देण्यात येत होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नगर तालुका पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी अपहृत तरूणाच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता ते कोल्हुबाईचे कोल्हार (ता. जि. अहिल्यानगर) परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नगर तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी खंडेराव शिंदे, विक्रांत भालसिंग तसेच दोन होमगार्ड यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.

स्टेशन डायरीत नोंद करून संबंधित पथकाला अपहृत तरुणाच्या भावासह व मित्रांसोबत तातडीने कोल्हार येथे रवाना करण्यात आले. दरम्यान, पोलीस पथकाने कोल्हार येथील दोस्ती नावाच्या हॉटेलमध्ये कैद करून ठेवलेल्या आकाश कार्ले याची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी अपहरणकर्त्यांनी पोलिसांवर अचानक हल्ला चढविला. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी विक्रांत भालसिंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर खंडेराव शिंदे हे किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत एमआयडीसी पोलीस, आरसीपी पथक आणि नगर तालुका पोलिसांच्या संयुक्त मदतीने विशेष कारवाई राबविली. या कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. जखमी भालसिंग यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘शब्दगंध’च्या माध्यमातून भाषा साहित्य व संस्कृतीचे जतन

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मराठी भाषा, आपले साहित्य आणि आपल्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचे काम शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गेल्या 16 वर्षापासून होत आहे. यामुळे अशी संमेलने...