अहिल्यानगर । सचिन दसपुते
अहिल्यानगर शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे दोन टोकाचे चित्र समोर आले आहे. गेल्या नऊ महिन्यांत (जानेवारी ते सप्टेंबर) शहरातील कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांनी खून, खूनाचा प्रयत्न, अत्याचार आणि दरोडा या गंभीर गुन्ह्यांमध्ये शंभर टक्के डिटेक्शन करून आरोपींना गजाआड केले आहे.
मात्र याउलट जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पोलीस यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली असून, तब्बल ३२१ पैकी केवळ ९७ गुन्ह्यांचा छडा लागला आहे. या घटनांमध्ये पोलिसांची पकड सैल झाल्याचे अधिकृत आकडेवारीतून समोर आले आहे. यामागील कारणांचा शोध घेतला असता गुन्हे उकलण्याची जबाबदारी असलेल्या गुन्हे शोध पथकावर (डिबी) सध्या अंतर्गत कुरघोड्यांचे काळे सावट पसरले आहे. पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्यातील राजकारण, गटबाजी आणि आर्थिक हितसंबंधांमुळे डिटेक्शनवर थेट परिणाम झाला आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबर गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. मध्यवर्ती भागातील कोतवाली, सावेडी उपनगरातील तोफखाना आणि भिंगार भागातील कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी जलदगतीने पूर्ण केला आहे. कोतवाली आणि तोफखाना हद्दीत प्रत्येकी तीन खुनाच्या घटना घडल्या असून सर्व आरोपी पोलिसांनी अटक केले आहेत. खूनाच्या प्रयत्नाच्या १९ घटनांपैकी सर्व गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच अत्याचाराच्या १७ गुन्ह्यातील आरोपींनाही पोलिसांनी पकडले आहे.
कोतवाली हद्दीतील तीन दरोड्यांचा देखील छडा लागला आहे. मात्र जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोडी आणि सामान्य चोरी या गुन्ह्यांकडे पोलिसांचे लक्ष पुरेसे नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. जबरी चोरीच्या पाच प्रकरणांपैकी केवळ तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे. सोनसाखळी चोरीच्या घटना विशेषतः सावेडी उपनगरात जास्त प्रमाणात घडत असून, एकट्या महिलांच्या गळ्यातील दागिने ओढून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या नऊ महिन्यांत कोतवाली हद्दीतील नऊ गुन्ह्यांपैकी चार तर तोफखाना हद्दीतील १३ गुन्ह्यांपैकी आठ गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला आहे. उर्वरित गुन्हे अद्याप अनडिटेक्टेड आहेत.
घरफोडीच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. कोतवाली हद्दीत २०, तोफखाना हद्दीत २३ आणि कॅम्प हद्दीत १३ अशा एकूण ५६ घरफोड्यांच्या घटनांपैकी केवळ २१ गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अजूनही ३५ घरफोड्यांचे गुन्हे प्रलंबित आहेत. चोरीच्या गुन्ह्यांचा विचार केला असता, एकूण २३८ प्रकरणांपैकी केवळ ६१ गुन्ह्यांचा तपास झाला असून तब्बल १७७ गुन्हे अद्याप अनडिटेक्टेड आहेत. यात दुचाकी, चारचाकी, सोने, रोख रक्कम अशा वस्तू चोरीला गेल्याची प्रकरणे प्रमुख आहेत.
शहरात दररोज चोरी, घरफोडी आणि सोनसाखळी घटनांमध्ये वाढ होत असताना डिटेक्शनचा दर घटतो आहे. सामान्य नागरिकांची दुचाकी, चारचाकी, दागिने, रोकड गायब होत असताना न्याय मिळण्याची शक्यता अल्प होत चालली आहे. गंभीर गुन्ह्यांवर जलद कारवाई कौतुकास्पद असली तरी ‘डिबी’तील कुरघोड्यांनी शहर पोलिसांच्या डिटेक्शन प्रणालीची वाट लावली आहे.
तपास अधिकाऱ्यांना गुन्ह्यातील आरोपींना पकडणे आणि मुद्देमाल परत मिळविण्यासाठी डिबी पथकाची मदत आवश्यक असते, मात्र तेथील गोंधळामुळे तपास लांबतो असल्याचे चित्र आहे. खून, अत्याचार, दरोडा यासारख्या गंभीर गुन्ह्यांना प्राधान्य देणे स्वाभाविक आहे; मात्र जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोडी आणि सामान्य चोरी या प्रकरणांतही तितकीच तत्परता आवश्यक आहे. शहरातील नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास टिकवायचा असेल, तर डिटेक्शन ब्रांचमधील अंतर्गत राजकारण थांबवून गुन्हे उकल करण्यावर लक्ष केंद्रीत करणे काळाची गरज आहे.
‘डिबी’ पथकात अंतर्गत ‘खेळ’
डिटेक्शनवर होणाऱ्या परिणामागे पोलीस विभागातील अंतर्गत राजकारण आणि कुरघोड्यांना मोठ्या प्रमाणात जबाबदार धरले जात आहे. गुन्हे शोध पथक म्हणजेच डिटेक्शन ब्रांच (डिबी) ही तपासातील मुख्य ताकद असते. मात्र सध्या या पथकात अंतर्गत वाद, कर्मचारी बदल, आणि आर्थिक फायद्यासाठी होणारी राजकारणे यामुळे तपासावर गंभीर परिणाम होत आहे. काही ठराविक कर्मचारी ‘डिबी’त कायम राहावेत यासाठी राजकारण सुरू असल्याने तपासाची गुणवत्ता खालावली आहे. अनेकवेळा या अंतर्गत कुरघोड्यांमुळे प्रभारी अधिकाऱ्यांना डिबी पथक बरखास्त करण्याची वेळ आली आहे. अंतर्गत राजकारण संपवून, डिबीला खऱ्या अर्थाने गुन्हे शोध पथक बनविण्याची गरज आता तातडीची आहे.
तपासावर बंदोबस्ताचे ओझे
तपास अधिकाऱ्यांकडे एकाच वेळी गुन्हे व बंदोबस्ताचे दुहेरी ओझे आहे. परिणामी, अनेक गुन्ह्यांचा तपास फक्त कागदोपत्री राहतो. गुन्ह्यातील आरोर्पीना पकडणे आणि मुद्देमाल परत मिळविण्यासाठी तपास अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी वेळ मिळत नाही. तसेच शहर पोलिसांवर कायमच बंदोबस्ताचा ताण असतो. तसेच कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा घटनांमध्ये अलिकडच्या काळात वाढ झाली आहे. दोन समाजातील तेढ निर्माण होऊन त्यातून निघणारे मोर्चे, आंदोलने यामुळे बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण आहे. याचा थेट परिणाम तपासावर होत आहे.





