Thursday, July 23, 2026
Homeक्राईमCrime News : मतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍याला नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप

Crime News : मतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍याला नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप

जिल्हा न्यायालयाचा निकाल || अहिल्यानगर शहरातील घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मतिमंद अल्पवयीन मुलीवर (वय 11) अत्याचार करणार्‍या 60 वर्षीय नराधमाला जिल्हा न्यायाधीश एम. एस. भदाणे यांनी नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. शकील सजन शेख (रा. मोची गल्ली, तोफखाना) असे त्याचे नाव असून त्याला विविध कलमांखाली दोषी ठरवत आजन्म सश्रम कारावासासह एकूण 1 लाख 10 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

- Advertisement -

न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेतील अत्याचार, विनयभंग आणि लैंगिक छळासह पोक्सो कायद्यातील विविध गंभीर कलमांखाली दोषी धरले. सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या असून आरोपीला त्याच्या नैसर्गिक मृत्यूपर्यंत कारागृहात राहावे लागणार आहे. 9 मे 2023 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपीने अल्पवयीन अल्पवयीन मुलीला नगर शहरातील एका दुकानाच्या तळघरात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करण्यास सुरूवात केली. मुलगी मोठ्याने ओरडत असल्याचा आवाज रस्त्याने जाणार्‍या काही युवकांना ऐकू आला. संशय आल्याने त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आरोपी अत्याचार करत असल्याचे निदर्शनास आले.

युवकांनी तत्काळ मुलीच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी एकत्र येत मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली आणि आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी त्याच रात्री मुलीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या खटल्यात सरकार पक्षाने एकूण 13 साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलीची साक्ष विशेष शिक्षिकेच्या माध्यमातून नोंदविण्यात आली. तोंडी व कागदोपत्री पुरावे, वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपीविरूध्दचा गुन्हा सिध्द झाल्याचे नमूद केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. अर्जुन पवार यांनी काम पाहिले. त्यांना सहायक निरीक्षक संजय चव्हाण, अंमलदार आर. डी. आडसुळ, नितीन गायकवाड यांनी सहाय्य केले.
दरम्यान, न्यायालयाने आरोपीकडून वसूल होणार्‍या दंडाच्या रकमेतून एक लाख रूपये पीडितेला देण्याचे आदेश दिले आहेत.

तपासात भक्कम पुरावे
घटनेनंतर पीडित मुलगी व आरोपी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मुलगी जन्मतःच मतिमंद असल्याचे प्रमाणपत्र जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त झाले. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला. पोलीस अंमलदार राजेंद्र भालसिंग यांनी त्यांना मदत केली. तपासादरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. पीडित व आरोपीचे कपडे जप्त करण्यात आले. मुलीची सुटका करणार्‍या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून त्याचा तपशीलवार पंचनामा करण्यात आला. सर्व पुरावे संकलित करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...