Sunday, September 6, 2026
HomeनगरKopargaon : कोपरगावात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

Kopargaon : कोपरगावात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

विनापरवाना बियाणे विक्रीचे रॅकेट उघड || तीन कंपन्यांसह पाच जणांवर गुन्हा

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Ranjangaon Deshmukh

- Advertisement -

राज्यात बंदी असलेल्या आणि संशयास्पद मानल्या जाणार्‍या एचटीबीटी (बोलगार्ड-3) कापूस बियाण्यांच्या बेकायदेशीर विक्रीचे रॅकेट कोपरगाव शहर पोलीस व कृषी विभागाच्या संयुक्त कारवाईत उघडकीस आले आहे. या कारवाईत 60 कापूस बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली असून सुमारे 54 हजार 60 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण सुनील बोरकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रवीण देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आणि तंत्र अधिकारी निलेश गढरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

कोपरगाव तालुक्यात संशयास्पद कापूस बियाण्यांची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाल्यानंतर बियाणे नियंत्रण निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी स्वतः डमी ग्राहक बनून तपास सुरू केला. त्यांनी मुख्य संशयित अकील रज्जाक शेख (रा. समतानगर, कोपरगाव) याच्याशी मोबाईलवर संपर्क साधून बियाण्यांची मागणी केली. अकील शेख याने त्यांना साईबाबा कॉर्नर येथे बोलावले. त्यानुसार कृषी अधिकारी बिरदवडे आणि पोलीस अंमलदार प्रवीण रणधीर यांनी सापळा रचला. भेटीदरम्यान आरोपीने सकाळीच एका शेतकर्‍याला तीन पाकिटे विकल्याची माहिती दिली तसेच दुपारी जळगावहून आणखी माल येणार असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पोलीस चौकशीत आरोपीने जळगाव जिल्ह्यातील भगवती सीड्स, चोपडा येथून विनापरवाना बियाणे मागवत असल्याची कबुली दिली. ही बियाणे राज्य परिवहन महामंडळाच्या बसमार्गे पार्सल सेवेद्वारे पाठवली जात असल्याचेही समोर आले. या माहितीनंतर पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोपीचंद कांदळकर, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, मंडळ कृषी अधिकारी साईनाथ मलीक व पंचांसह पथकाने येवला बसस्थानकावर धाड टाकली. तेथे आलेल्या दोन गोण्यांची तपासणी केली असता त्यामध्ये 60 कापूस बियाण्यांची पाकिटे आढळून आली.

जप्त करण्यात आलेल्या पाकिटांवर बोलगार्ड बीजी-11, वाण केसीएचएच-1049 असे नमूद करण्यात आले होते. तसेच कीर्तिमान अ‍ॅग्रो जेनेटिक्स लिमिटेड (औरंगाबाद), नर्मदा सागर अ‍ॅग्री सीड्स (गुजरात) आणि विश्वास अ‍ॅग्रोटेक (गुजरात) या कंपन्यांची नावे व पत्ते छापलेले आढळले. शेतकर्‍यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने दिशाभूल करणारे लेबलिंग करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कृषी विभागाने पंचांसमक्ष नमुने घेऊन ते तपासणीसाठी केंद्रीय बियाणे प्रयोगशाळा, नागपूर येथे पाठविले आहेत.

अकील रज्जाक शेख कोपरगाव, मालक भगवती सीड्स चोपडा (जळगाव), व्यवस्थापकीय संचालक कीर्तिमान अ‍ॅग्रो जेनेटिक्स लि., औरंगाबाद, नर्मदा सागर अ‍ॅग्री सीड्स प्रा. लि., गुजरात, विश्वास अ‍ॅग्रोटेक, साबरकांठा (गुजरात) या पाच जणांवर कारवाई करण्यात आली. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 3(5) तसेच बियाणे अधिनियम 1966, बियाणे नियम 1968 आणि बियाणे नियंत्रण आदेश 1983 मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकर्‍यांना अनधिकृत आणि संशयास्पद बियाण्यांपासून सावध राहण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

एसटी बस पार्सलमधून येत होती पाकिटे
ही बियाणे राज्य परिवहन महामंडळाच्या बसमार्गे पार्सल सेवेद्वारे पाठवली जात असल्याचेही समोर आले. कारवाईसाठी गेलेल्या पथकाने येवला बसस्थानकावर धाड टाकली. तेथे आलेल्या दोन गोण्यांची तपासणी केली असता त्यामध्ये 60 कापूस बियाण्यांची पाकिटे आढळून आली.

ताज्या बातम्या

Raj Thackeray : महापुरुषांच्या रांगेत पंतप्रधानांचा फोटो नको, GDP च्या दाव्यावरही...

0
ठाणे | Thane महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज (रविवारी) ठाण्यात (Thane) पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या...