Tuesday, October 20, 2026
Homeनगरश्रीरामपूर, संगमनेरच्या सराईत टोळीवर संघटित गुन्हेगारीचे कलम

श्रीरामपूर, संगमनेरच्या सराईत टोळीवर संघटित गुन्हेगारीचे कलम

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

घरात झोपलेल्या महिलेचा गळा दाबून, चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने, रोख रक्कम लुटणार्‍या श्रीरामपूरच्या मनोज मांजरे याच्या टोळीविरूध्द तोफखाना पोलिसांनी संघटित गुन्हेगारीचे भारतीय न्याय संहितेतील कलम 111 वाढीव लावण्याची कारवाई केली आहे.

- Advertisement -

टोळीप्रमुख मनोज गोरख मांजरे (वय 27, रा. गुंडेवस्ती मातापुर, ता. श्रीरामपूर, हल्ली रा. शिवाजीनगर, कल्याण रोड, अहिल्यानगर) याच्यासह त्याचे दोन साथीदार उमेश दिलीप गायकवाड (वय 22, रा. दिल्लीनाका, कुरण रोड, संगमनेर) आणि पवन ज्ञानेश्‍वर कुर्‍हाडे (वय 27, रा. शिरसगाव लौकी, ता. येवला, जि. नाशिक) यांच्याविरूध्द ही कारवाई करण्यात आली आहे. या टोळीतील आरोपींवर 2018 ते 2026 या कालावधीत शरीराविरूध्दचे आणि मालमत्तेविरूध्दचे 23 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बोल्हेगाव परिसरातील भोरमळा येथे 9 ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास लुटमारीची घटना घडली होती. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी गोपनीय माहिती, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेऊन तिघा संशयित आरोपींना अटक केली होती.

यापूर्वीही या आरोपींविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुरूच असल्याने टोळीविरूध्द अधिक प्रभावी कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यानुसार तोफखाना पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम 111 वाढीव लावण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित गुन्ह्यात संघटित गुन्हेगारीचे वाढीव कलम लागू करण्यात आले. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक कलुबर्मे आणि पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बालाजी वैद्य, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, अंमलदार रोकडे, हेमंत झिने यांनी ही कारवाई केली.

दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपींच्या गुन्हेगारी अभिलेखांची तपासणी केली असता, टोळीप्रमुख आणि सदस्यांवर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. परिसरातील तरूणांना आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून एकत्र करणे, नागरिकांवर हल्ले करणे तसेच परिसरात दहशत निर्माण करणे, अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा त्यात समावेश असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला सर्वाधिक 5000 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांद्यांची (Onion) 1207...