श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
शहरात खुलेआम सुरू असलेल्या बिंगो जुगारामुळे अनेक तरुण कर्जबाजारी होत असल्याचे वृत्त दैनिक सार्वमतने आठ दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे टाकून कारवाई केली. या कारवाईत 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
मात्र, शहरातील उर्वरित जुगार अड्ड्यांवर कारवाई कधी होणार आणि या अवैध व्यवसायाला नेमके कोणाचे अभय आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सहायक पोलीस उपनिरीक्षक हरिष भोपे आणि पोलीस अंमलदार बालासाहेब नागरगोजे, अरुण गांगर्डे, अशोक लिपणे, श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे, अतुल लोटके, विरण्या करमल, रोहित मिसाळ व प्रताप देवकाते यांची दोन पथके तयार केली होती. या पथकांनी 16 नोव्हेंबर 2026 रोजी नेवासा व श्रीगोंदा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार ठिकाणी छापे टाकून एकूण 1 लाख 28 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यापैकी श्रीगोंदा शहरातील तीन अड्ड्यांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
पहिल्या अड्ड्यावरून 37 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून शुभम अरविंद दिशेवर (वय 28, रा. अवधूतनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुसर्या अड्ड्यावरून 27 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ऋषिकेश निवृत्ती डेंगळे (वय 27, रा. कुंभार गल्ली, श्रीगोंदा) याच्यावर, तर तिसर्या अड्ड्यावरून 45 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून योगेश अनिल पाडळे (वय 32, रा. सिद्धार्थनगर, श्रीगोंदा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, श्रीगोंदा शहरात आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक दिवसांपासून बिंगो जुगारासह विविध अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. या जुगारामुळे अनेक तरुण कर्जबाजारी होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध होऊनही स्थानिक पातळीवर कारवाई झालेली नव्हती. आता स्थानिक गुन्हे शाखेने तीन अड्ड्यांवर छापे टाकले असताना, श्रीगोंदा पोलिसांनी यापूर्वी कारवाई का केली नाही आणि उर्वरित अड्ड्यांवर कारवाई कधी होणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.



