Wednesday, January 7, 2026
HomeनगरAhilyanagar Politics : अहिल्यानगरमध्ये महायुतीचा ‘राजकीय स्फोट’

Ahilyanagar Politics : अहिल्यानगरमध्ये महायुतीचा ‘राजकीय स्फोट’

जागावाटपाच्या लढाईत डावलल्याचा आरोप

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीत मोठा भूकंप झाला असून जागावाटप फिस्कटल्याने शिवसेनेने (शिंदे गट) अखेर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे शहरातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली असून आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्रितपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांच्या जागांवरच भाजप आणि राष्ट्रवादीकडून दावा सांगितल्याने संघर्ष टोकाला गेला. महायुती तोडण्याचा पहिला निरोप भाजपकडूनच आला, असा थेट आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी केला आहे.

- Advertisement -

सोमवारी (29 डिसेंबर) सायंकाळी शिंदे गटाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अनिल शिंदे यांनी ही माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. अनिल शिंदे म्हणाले, ज्या नगरसेवकांनी आमच्या पक्षावर विश्वास ठेवून प्रवेश केला, त्याच जागा आमच्याकडून हिसकावण्याचा प्रयत्न सुरू होता. 15 दिवस चर्चा सुरू होती, परंतु प्रत्येक टप्प्यावर आम्हालाच डावलले गेले. अखेर आज (सोमवारी) सकाळी भाजपाच्या वतीने संभाजी कदम यांना फोन करून तुमचे-आमचे जमत नाही असा निरोप दिला. त्यानंतर स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय उरला नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

YouTube video player

शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर यांनी स्पष्ट केले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युती टिकवण्याचे प्रयत्न करण्यास सांगितले होते. मात्र सन्मानजनक तोडगा निघत नसेल, तर अवास्तव मागण्या मान्य करू नका, अशीही स्पष्ट सूचना होती. त्यामुळे आता शिवसेना 68 पैकी 40 ते 50 जागा ताकदीने लढवणार आहे. आमच्याकडे सक्षम उमेदवारांची फळी तयार आहे, असेही ते म्हणाले. भाजप आणि राष्ट्रवादी ही नैसर्गिक युती नाही. शिवसेना- भाजप ही खरी नैसर्गिक युती होती. नगरकर ही अनैसर्गिक युती स्वीकारतील का, हा मोठा प्रश्न आहे. भाजपचे काही प्रामाणिक व लोकाधार असलेले उमेदवार आमच्याकडे आले, तर त्यांच्या उमेदवारीवर सकारात्मक विचार केला जाईल, असे माजी नगरसेवक संभाजी कदम यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीत महायुती होणार असे तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सांगितले जात होते. त्यासंदर्भातील जोर बैठका सातत्याने सुरू होत्या. मात्र उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एक दिवस बाकी असताना शिंदे सेना महायुतीतून बाहेर पडली आहे. भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस कडून त्यांना जागा वाटपामध्ये जाणीवपूर्वक झुलत ठेवले असल्याचे बोलले जात आहे. शेवटी महायुती होणार नसल्याचे कळविल्याने ऐनवेळी शिंदे गट एकाएकी पडला असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे युवा सेनेचे सहसचिव विक्रम राठोड शिंदे गटात दाखल झाले असून, लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे. राठोड यांच्या पत्नी तेजस्विनी राठोड उमेदवारीस इच्छुक असून याबाबत चर्चा सुरू असल्याचे शहरप्रमुख सचिन जाधव यांनी सांगितले.

तीन प्रभागांवरून संघर्ष पेटला
महायुती तुटण्यामागे प्रभाग क्रमांक 11, 15 आणि 16 हा कळीचा मुद्दा ठरला. प्रभाग 15 मध्ये अनिल शिंदे व सुवर्णा जाधव, प्रभाग 16 मध्ये दिलीप सातपुते, तर प्रभाग 11 मध्ये संतोष गेनप्पा यांनी उमेदवारी मागितली होती. याशिवाय माळीवाड्यातील संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे व मंगला लोखंडे यांच्या उमेदवारीलाही भाजप-राष्ट्रवादीकडून आक्षेप घेतल्याचे समोर आले आहे. यामुळे महायुतीमध्ये फुट पडली. शिंदे सेनेने आपली भूमिका जाहीर केली असून आज (मंगळवार) अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने त्यांच्या उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ होणार आहे. 50 एबी फॉर्म आले असल्याचे अनिल शिंदे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...