Tuesday, June 16, 2026
HomeनगरAhilyanagar : नगर जिल्ह्यात 99 टक्के पाऊस

Ahilyanagar : नगर जिल्ह्यात 99 टक्के पाऊस

कमी दिवसांत जास्त पाऊस, नंतर मोठे खंड, एल निनोचा सध्या प्रभाव नाही

पुणे |प्रतिनिधी| Pune

राज्यात यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ आणि ‘कृषी हवामान फोरम साऊथ आशिया’चे संस्थापक सदस्य डॉ. रामचंद्र साबळे यांनी सोमवारी व्यक्त केला. या अंदाजामध्ये 5 टक्के कमी-अधिक तफावत असू शकते असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात 99 टक्के पाऊस बरसेल असा दावाही त्यांनी केला आहे. डॉ. साबळे यांनी जून ते सप्टेंबर या कालावधीचा दीर्घकालीन पावसाचा अंदाज सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला.

- Advertisement -

हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वार्‍याचा वेग आणि सुर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. या वर्षी वार्‍याचा ताशी वेग कमी आढळल्याने महाराष्ट्रातील सर्वच भागात मोठे खंड राहण्याची शक्यता आहे. जुलैच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून आँगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिल, असे त्यांनी सांगितले.

यंदा पावसाचे वितरण असमान राहण्याची चिन्हे आहेत. राज्यातील धुळे, सोलापूर, जळगाव, चंद्रपूर, भंडारा, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि पुण्याचा पूर्व भाग अशा काही भागांमध्ये पावसाचे मोठे खंड पडण्याची दाट शक्यता असल्याने स्थिती काहीशी चिंताजनक राहू शकते. या खंडांचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर होणार असल्याने शेतकर्‍यांनी यंदा कमी कालावधीची, कमी पाण्याची आणि आंतरपीक पद्धतीचा प्रामुख्याने अवलंब करावा, असे आवाहन डॉ. साबळे यांनी केले.

घाबरण्याचे कारण नाही
जागतिक पातळीवर होणारा हवामान बदल, वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड यांसारख्या हरितगृह वायूंचे वाढते प्रमाण आणि मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड यांचा थेट परिणाम मान्सूनच्या वितरणावर होत आहे. प्रशांत महासागरातील विषुववृत्तीय भागातील पाण्याचे तापमान आणि हिंदी महासागरातील ‘आयओडी’ स्थितीचाही पावसावर प्रभाव पडत आहे. मात्र, काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी वर्तवलेल्या ‘सुपर एलनिनो’ किंवा भीषण दुष्काळाच्या भीतीला न घाबरता शेतकर्‍यांनी नियोजनबद्ध शेती करावी, कारण राज्याच्या बहुतांश भागात पाऊस 90 टक्क्यांच्या खाली जाणार नाही, असा विश्वासही डॉ. साबळे यांनी व्यक्त केला.

विभागावार पावसाच्या अंदाजाचा विचार करता, पूर्व विदर्भात सरासरीच्या 96 टक्के, मध्य विदर्भात 100 टक्के (नागपूर आणि यवतमाळ 100 टक्के), तर पश्चिम विदर्भात 97 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा विभागात पावसाचे प्रमाण कमी-अधिक राहील. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात सर्वाधिक चिंतेची बाब असून, तिथे 94 टक्के पावसाचा अंदाज आहे. जळगाव 96 टक्के, तर नाशिकमधील निफाड येथे 98 टक्के पाऊस अपेक्षित आहे. मराठवाड्यातील परभणी आणि जालना येथे 100 टक्के, तर कोकणातील दापोली येथेही 100 टक्के पावसाचा अंदाज आहे. पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण 97.6 टक्के राहील, ज्यामध्ये पुणे केंद्राच्या परिसरात 100 टक्के, तर सोलापूर आणि कोल्हापूर येथे 96 टक्के पावसाची शक्यता आहे. या पावसाच्या जोरावर राज्यातील मध्यम आणि लहान धरणे भरतील, मात्र जायकवाडी आणि उजनी यांसारखी मोठी धरणे पूर्ण क्षमतेने भरतीलच असे खात्रीने सांगता येत नाही. मुंबई आणि पुण्याचा पाण्याचा प्रश्न मात्र यंदा गंभीर होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तोपर्यंत शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये
शेतीविषयक सल्ला देताना डॉ. साबळे म्हणाले,किमान 65 मिलिमीटर पाऊस होत नाही किंवा जमिनीत दोन ते तीन फूट खोलीपर्यंत पुरेसा ओलावा जात नाही, तोपर्यंत शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये. लवकर पेरणी केल्यास पावसाच्या खंडामुळे पिकांची वाढ खुंटण्याची भीती असते. शेतकर्‍यांनी मूग, मटकी, चवळी, उडीद, सोयाबीन, बाजरी आणि ज्वारी यांसारख्या कमी कालावधीच्या पिकांचे क्षेत्र वाढवावे. कापूस, ऊस, हळद आणि आले यांसारखी जास्त कालावधीची पिके शक्यतो ठिबक सिंचनाखाली आणावीत. आंतरपीक पद्धतीमध्ये बाजरी अधिक तूर किंवा कापूस अधिक मूग यांसारख्या जोड्यांना प्राधान्य दिल्यास जोखीम कमी होईल. कोकणातील भात उत्पादकांनी रोपवाटिका दोन टप्प्यांत तयार कराव्यात, जेणेकरून पावसाला उशीर झाला तरी लागवडीच्या वेळी रोपांचे वय जास्त होणार नाही.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...