अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर शहर आणि तालुक्यात रविवारी रात्री व सोमवारी झालेल्या सर्वदूर पावसाने वेगवेगळ्या नद्यांना महापुर आला. महापुरामुळे अनेक गावांचा काही काळासाठी संपर्क तुटला होता तर जामखेड रोडवरील सारोळाबद्दी येथील पुलाचे काम सुरू असल्याने तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेला पूल वाहून गेल्याने रस्ता वाहतुकीसाठी आठ ते दहा तास बंद होता. विजेच्या कडकडाटसह तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला आहे.
परतीच्या पावसाने तालुक्यात जोरदार हजेरी लावली. ससेवाडी, जेऊरपट्ट्यात झालेल्या जोरदार पावसामुळे सीना नदीला महापुर आला होता. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे संपूर्ण बाजारपेठेत पाणी शिरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. जेऊर गावातील नागरिकांचा काही काळासाठी संपर्क तुटला होता. शाळेतील विद्यार्थी देखील पुरामुळे गावामध्ये अडकले होते. जोरदार पावसामुळे जेऊर परिसरातील शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या होत्या. बहिरवाडी- इमामपूरवरून वाहणार्या खारोळी नदीला देखील पूर आला होता. सीना व खारोळी नदीवरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो झाले असून चालूवर्षी प्रथमच पिंपळगाव तलावात पाण्याची नव्याने आवक झाली आहे.
तालुक्यातील 12 महसूल मंडळामध्ये सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. देहरे येथील देव नदीला महापुर आला होता. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांच्या बाजरी व सोयाबीन पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. विळद, मांजरसुंबा गड, डोंगरगण परिसरात झालेल्या पावसाने काही प्रमाणात बंधारे, तलाव भरले गेले आहेत. शेंडी, पोखर्डी, पिंपळगाव माळवी परिसरात देखील चांगल्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. सारोळा कासार, अकोळनेर, रुईछत्तीसी, वाळकी, भोरवाडी, चास, अकोळनेर, खडकी परिसरात विजांच्या कडकडाटासह संततधार पाऊस सुरू होता. परिसरातील पूर्वा व वाळूंबा नद्या सुरुवातीपासूनच वाहत होत्या. त्यांच्या पाण्याच्या पातळीत पावसामुळे काही प्रमाणात वाढ झाली. धोंडेवाडी तलाव ओव्हरफ्लो झाला असून रुईछत्तीसी परिसरातील शुढळा नदीच्या पाण्याच्या पातळीत देखील वाढ झाली होती.
हिंगणगाव, जखणगाव परिसरात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. हिंगणगाव परिसरातील जखणगाव सिना नदी व उंबरनाला नद्यांवरील सर्व बंधारे पहिलेच तुडुंब भरलेले होते. चिचोंडी पाटील परिसरात मेहेकरी नदीला महापुर आल्याचे पहावयास मिळाले. आष्टी तालुक्यातील हरेगाव तलाव फुटल्यामुळे केळ तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. केळ तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. भातोडी तलाव देखील ओव्हर फ्लो झाला आहे. मेहकरी नदीला आलेल्या महापुरामुळे नदी परिसरातील शेतामध्ये पाणी शिरल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.
जामखेड रस्त्यावरील सारोळा बद्दी येथे नवीन पुलाचे काम सुरू असल्याने तात्पुरत्या स्वरूपात बनविण्यात आलेला पूल वाहून गेला. त्यामुळे जामखेड रोडवरील वाहतूक सुमारे दहा तास बंद होती. पिंपळगाव माळवी तलावात चालू वर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून अद्याप पाणी आलेच नव्हते. तलाव जवळपास कोरडाठाक पडलेला होता. सीना व खारोळी नदीला आलेल्या महापुरामुळे प्रथमच पिंपळगाव तलावामध्ये नव्याने पाण्याची आवक झाली आहे.
दिल्लीगेट, चितळे रस्ता, माळीवाडा, बाजारपेठ, नवी पेठ आणि सावेडी उपनगरातील रस्त्यांवर पाणीच पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी चारचाकी आणि दुचाकी वाहने पाण्यात अडकली. काही भागात झाडे कोसळल्याने रस्ते बंद झाले. अर्बन बँकेसमोरचा जुना वाडा पावसामुळे कोसळला. महानगरपालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रात्रभर कोसळणार्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने रात्र जागून काढावी लागली. पावसामुळे वीज देखील गायब झाली होती.




