Monday, April 7, 2025
HomeनगरAhilyanagar : पोलिसांनी दिलेल्या मार्गावरून श्रीरामनवमी मिरवणूक उत्साहात

Ahilyanagar : पोलिसांनी दिलेल्या मार्गावरून श्रीरामनवमी मिरवणूक उत्साहात

घोषणाबाजी अन् डीजेचा दणदणाट || देखाव्याने जिंकली प्रेक्षकांची मने

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

श्रीरामनवमी निमित्त रविवारी शहरातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. पोलीस प्रशासन भूमिकेवर ठाम राहिल्याने नवीन मार्गानेच मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने प्रभू श्रीरामलल्ला दर्शनाचा देखावा सादर करण्यात आला. तर सकल हिंदू समाजाच्यावतीने अफजल खानाच्या वधाचा जिवंत देखावा मिरवणुकीत सादर करण्यात आला. या देखाव्याने प्रेक्षकांची मने जिंकली. दरम्यान, किरकोळ घोषणाबाजी वगळता डीजेच्या दणदणाटात मिरवणूक शांततेत पार पडली.

- Advertisement -

दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणूक सुरू करण्यात आली. सकल हिंदू समाज, हिंदूराष्ट्र सेना, वास्तव कंपनी ग्रुप, श्रीराम सेना अशा चार संघटना मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची जुन्या मार्गाने मिरवणूक काढण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, पोलिसांनी नवीन मार्गानेच मिरवणूक जाईल, अशी व्यवस्था केली होती. पोलीस प्रशासन ठाम राहिल्याने पंचपीर चावडी – बॉम्बे बेकरी – चांद सुलताना स्कूल – माणिक चौक मार्गे जय श्रीरामच्या जयघोषात मिरवणूक मार्गस्थ झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी पालख्या, प्रभू श्रीराम व वीर हनुमान यांची मूर्ती, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य पुतळे सजवलेल्या रथावर सहभागी करण्यात आले होते. ठिकठिकाणी त्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणूक मार्गावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

पोलीस अधीक्षक राकेश ओला स्वतः सर्व अधिकार्‍यांसह मिरवणूक मार्गावर तळ ठोकून होते. ड्रोनव्दारे मिरवणुकीवर वॉच ठेवण्यात आला. किरकोळ घोषणाबाजी वगळता मिरवणूक शांततेत पार पडली. दरम्यान, माळीवाडा- पंचपीर चावडी परिसरातून मिरवणूक जात असताना लाऊडस्पिकरवरून तणाव निर्माण होईल, अशी घोषणा देण्यात आली. मात्र, घोषणा संपायच्या आतच तेथे उपस्थित असलेल्या उपअधीक्षक अमोल भारती व त्यांच्या पथकाने लाठी चालवत डीजे बंद केला. काही वेळ डीजे बंद ठेवल्यावर त्यावर पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आला व मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली. मिरवणुकीत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आमदार संग्राम जगताप, मंत्री नितेश राणे यांचे पोस्टर झळकले. राजकीय नेत्यांसह अखंड हिंदुस्थानचा नकाशा असलेले फलकही युवकांनी झळकावले. ‘एक दिन ऐसा आयेगा पाकिस्तान में भगवा लहराएगा’ अशा घोषणा पोस्टरवर होत्या.

पोलिसांचे योग्य नियोजन
श्रीरामनवमी मिरवणूक जुन्या आशा टॉकीजमार्गेच काढणार असल्याची भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली होती. पोलीस प्रशासन मात्र बॉम्बे बेकरी, चांद सुलतानामार्गेच मिरवणूक नेण्यावर ठाम होते. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी योग्य तयारी केली होती. पंचपीर चावडी येथून आशा टॉकीजकडे जाणार्‍या मार्गावर पत्रे ठोकून बॅरिकेटिंग करून रस्ता बंद ठेवण्यात आला होता. मिरवणूक मार्गावर ‘नो व्हेईकल झोन’ जाहीर केला होता. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 222 जणांना हद्दपार करण्यात आले होते. सीसीटीव्हीच्या नजरेसह तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मुद्रांक शुल्कातून 441 कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सहजिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयास 2024-25 या आर्थिक वर्षात मुद्रांक शुल्क वसुलीचे 520 कोटी रूपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते....