अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे तात्पुरत्या स्थगित केलेल्या जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्यांना पुन्हा एकदा संमती मिळाल्याने सोमवारी (दि. 25) या बदल्या होत आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात देखील कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापतीपद रिक्त असल्याने या मतदारसंघाला आणि जिल्हा प्रशासनाला आचारसंहिता लागू नसल्याने या बदल्या होणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व 4 कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया दरवर्षी 31 मे अगोदर राबविली जाते. यंदा ही प्रक्रिया 6 ते 8 मे या दरम्यान राबविण्याबाबत जिल्हा परिषदेने वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र, जिल्हा परिषदेचे बहुतांश कर्मचारी जनगणनेसाठी नियुक्त आहेत. या कर्मचार्यांना बदल्यांमधून वगळण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र किती कर्मचारी जनगणनेसाठी घेतले, ही माहिती प्रशासनाकडून उपलब्ध नसल्याने 6 ते 8 मे या कालावधीतील बदल्यांची प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यानंतर ही माहिती उपलब्ध झाल्यावर प्रशासनाने पुन्हा नव्याने वेळापत्रक जाहीर करून 19 मे रोजी बदल्या ठेवल्या.
दरम्यान, 18 मे रोजी राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांसाठी आचारसंहिता लागू झाली. त्यात अहिल्यानगर मतदारसंघाचाही समावेश आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने आचारसंहितेचे कारण देत मंगळवारी (दि. 19) होणारी बदल्यांची प्रक्रिया स्थगित केली. आचारसंहितेत बदल्या कराव्या की नाहीत याबाबत जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते. त्यास शासनाने परवानगी दिली असल्याने आता सोमवारी सकाळच्या सत्रात बदल्यांची प्रक्रिया होत असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने कळवले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात देखील कर्मचार्यांची बदली प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या ठिकाणी देखील आचारसंहिता नसल्याने या बदल्या करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
बदल्यांचे नवीन वेळापत्रक
कृषी विभाग : सकाळी 9.45 वाजता
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग : सकाळी 10.15 वाजता.
पशुसंवर्धन विभाग : सकाळी 10.30 वाजता.
आरोग्य विभाग : सकाळी 11 वाजता.




