Thursday, July 2, 2026
Homeनगरकरोनाने ओलांडली शंभरी, आणखी चौघे बाधित

करोनाने ओलांडली शंभरी, आणखी चौघे बाधित

55 अहवाल येणे बाकी ः जिल्ह्याचा रुग्ण मृत्यूदर 8.73 टक्के

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – पुण्या-मुंबईहून येणार्‍या पाहुण्यांनी जिल्ह्यात करोनाचा फैलाव झपाट्याने करण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यात करोनाच्या रूग्णांनी शंभरी गाठली असून जिल्ह्या बाहेरून येणार्‍या पाहुण्यांमुळे जिल्ह्याचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गुरूवारी जिल्ह्यात आणखी चार रूग्णांची भर पडली असून जिल्ह्यात 103 जण करोना बाधित रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 9 मृत्यू झाले असून जिल्ह्याचा मृत्यूदर हा 873 टक्के आहे.

- Advertisement -

गुरूवारी सकाळी जिल्हा रुग्णालयाच्या करोना प्रयोग शाळेतून आलेल्या तपासणी अहवालात 50 पैकी 4 अहवाल नव्याने पॉझिटिव्ह आढळून आले. यात घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले वडील आणि मुलगी करोना बाधित असून इतर दोन नेवासा आणि श्रीगोंदा येथील आहेत. बुधवारी घाटकोपर येथून आलेल्या 66 वर्षीय पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात हे दोघे आले होते.

याशिवाय नेवासा बुद्रुक येथेही एक 30 वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. चार दिवसांपूर्वी कल्याण येथून नेवाशात आलेली महिला पॉझिटिव्ह सापडली होती. गुरूवारी पॉझिटिव्ह सापडलेला हा युवक त्या महिलेचा संपर्कात आला असून तो तिचा नातू आहे. यासह श्रीगोंदा तालुक्यातील एक दहा महिन्यांचे बाळ देखील करोना पॉझिटिव्ह आले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 103 झाली आहे. त्यात महापालिका क्षेत्रातील 18, उर्वरित जिल्ह्यातील 50, इतर राज्यातील 2, इतर देशातील 8, तर इतर जिल्ह्यातील 25 जणांची समावेश आहे. त्यातील 58 जणांना डिस्चार्ज दिला आहे. सध्या 30 जणांवर नगर, तर 3 जणांवर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. 103 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 9 व्यक्तींचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील रुग्णांचा मृत्यूदर हा 8. 73 टक्के असल्याचे आरोग्य विभाग यंत्रणे कडून सांगण्यात आले.

चौघांना डिस्चार्ज
जिल्ह्यातील 4 रूग्ण गुरूवारी बरे झाल्याने त्यांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यात पाथर्डी व संगमनेर तालुक्यातील प्रत्येकी एक, तर सारसनगर येथील दोघांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 58 रूग्ण बरे झाले आहेत.

10 महिन्यांच्या बाळासह आई क्वारंटाईन
तीन दिवसांपूर्वी पुण्याहून श्रीगोंद्यात आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने अवघ्या दहा महिन्यांचे बाळ कोनाबाधित आढळले आहे. या बाळावर बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोटच्या गोळ्यासाठी जीवावर उदार होऊन त्याची आई या बाळासोबत रूग्णालयात क्वारंटाईन झाली आहे. दरम्यान, मागील आठवड्यात राशीन येथील 6 वर्षांची बालिका पॉझिटिव्ह आढळली होती. तिच्यासोबत तिचे वडील सध्या बूथ हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन आहेत.

संगमनेरात आणखी एक करोनाबाधीत

तालुक्याची संख्या 30 वर

संगमनेर (प्रतिनिधी)- नगर खालोखाल संगमनेरमध्ये करोनाबाधीतांची संख्या वाढताना दिसत आहे. काल शहरातील भारतनगर येथील एक 66 वर्षीय पुरुष करोनाबाधीत आढळला आहे. सदर परिसर सील करण्यात आला असून सदर व्यक्तीची पत्नी व मुलगा यांचा स्वॅब घेण्यात आला आहे. तर बुधवारी घुलेवाडीमधील मालपाणीनगर येथे रहिवाशी असलेले डॉक्टर करोनाबाधीत आढळल्याने त्यांच्या पत्नीसह 10 नातेवाईकांना पुढील तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले आहे.

मालपाणीनगर गल्ली क्रमांक 2 हा भाग प्रतिबंधात्मक म्हणून घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार तथा इन्सीडेंट कमांडर अमोल निकम यांनी दिली.
बुधवारी घुलेवाडीमधील मालपाणीनगर येथील गल्ली क्रमांक 2 मध्ये रहिवाशी असलेले डॉक्टर हे सिन्नर तालुक्यातील दापूर येथे वैद्यकीय सेवा देण्यासाठी जातात. तेथे ते करोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या घुलेवाडी येथील मालपाणी नगर गल्ली क्रमांक 2 मधील घरातील पत्नी व मुलगा तसेच त्यांची सासुरवाडी असलेल्या राजापूर येथील सहा व्यक्ती तर चिंचोली गुरव येथे रहात असलेले आई-वडील अशा एकूण 10 व्यक्तींना वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. बुधवारी रात्री 11 वाजता सदर व्यक्तींना नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

घुलेवाडी येथील मालपाणीनगर गल्ली क्रमांक 2 हा भाग प्रशासनाने प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. सदर क्षेत्रातील सर्व अस्थापना, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री इत्यादी 27 मे 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दिनांक 9 जून 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. या क्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान तसेच सदर क्षेत्रातून वाहनांचे अवागमन प्रतिबंधीत करण्यात आले आहे. सदर आदेशाच्या अंमलबजावणीसाठी संनियंत्रण अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी एस. टी. कुटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश चांदोरकर, संनियंत्रण अधिकारी घुलेवाडीचे तलाठी बी. एस. काकड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मालपाणीनगर येथे राहणारे डॉक्टर हे सिन्नर तालुक्यातील दापूर येथे जाऊन-येऊन करतात. त्यामुळे मालपाणीनगर येथे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही माहिती प्रशासन घेत आहे. शहरातील भारतनगर येथे काल गुरुवारी 66 वर्षीय पुरुष करोना पॉझिटिव्ह आल्याने सदर परिसर सील करण्यात आला आहे. सदर व्यक्तीची पत्नी व मुलगा यांचा स्वॅब घेण्यात आला असून राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.

भारतनगर भागातील एका व्यक्तीला करोना विषाणूची लागण झालेली असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संगमनेर शहरातील भारतनगर, रहेमतनगर, उम्मतनगर, डोंगरे मळा, पठारे वस्ती हे क्षेत्र कंटेन्मेंट झोन व जुना जोर्वे रोड, अलकानगर, कोल्हेवाडी रस्ता, वाबळे वस्ती हे क्षेत्र बफर झोन म्हणून घोषित क्षेत्रातील करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी क्षेत्र प्रतिबंधीत करणे, क्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान प्रतिबंधीत करणे व क्षेत्रातून वाहनांचे अवागमन दिनांक 10 जून 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

संगमनेर तालुक्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी संगमनेरात सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना मुभा देण्यात आली आहे. व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. हे व्यवहार सुरू ठेवताना प्रशासनाने अटी व शर्ती टाकल्या आहेत. या नियमांचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

संगमनेरचे व्हीलेज क्वारंटाईन
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संगमनेर शहर व तालुक्यात आढळलेले करोनाबाधीत व त्यांच्या संपर्कात आलेले व्यक्ती तसेच बाहेर गावाहून आलेल्या व्यक्ती अशा एकूण 3 हजार 198 व्यक्तींना व्हिलेज क्वारंटाईन करण्यात आले. तर क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींपैकी 1 हजार 132 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नेवासा बुद्रुकच्या करोनाबाधित महिलेचा नातूही निघाला संक्रमित

नेवासा बुद्रुक (वार्ताहर)- कल्याण येथून नेवासा बुद्रुक येथे आलेल्या करोना संक्रमित महिलेच्या संपर्कातील तिच्या नातवाचा तपासणी अहवाल काल नेवासा तहसीलदारांना प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी काल दिली.

कल्याण येथून 20 मे रोजी सदर महिला नेवासा बुद्रुक येथे आल्यानंतर तिची तपासणी केली असता 24 मे रोजी तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता त्यानंतर तिच्या संपर्कातील सात व्यक्तींना स्त्राव तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यामधील चार व्यक्तींचे स्त्राव नेवासा येथील कोविड सेंटर मध्ये घेण्यात आले. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

तर महिलेचा जावई व नातवास नगर येथे स्त्राव तापसणीसाठी पाठवले होते. मात्र तपासणी न करता त्यानी जिल्हा रुग्णालयातुन पळ काढला.दरम्यान 25 मे रोजी या महिलेचा जावई नेवासा बुद्रुक येथे आला असल्याचे समजताच ग्राम दक्षता समितीने त्यास गांवातील स्मशानभूमी जवळ पकडून विलगिकरण कक्षात दाखल केले. तर नातू 26 मे रोजी घोडेगाव परिसरात असल्याची माहिती प्रशासनाला समजताच त्याला आरोग्य व पोलीस यंत्रणेने घोडेगाव येथे ताब्यात घेऊन नेवासा येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले होते.

बुधवारी दोघांचे स्त्राव घेऊन नगर येथे तापसणीसाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान गुरुवारी सकाळी नातवाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून महिलेच्या जावयाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे तहसीलदार रुपेश सुराणा यांनी सांगितले. दरम्यान विलगिकरण कक्षात असलेल्या पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला नगर येथे पाठविले असून त्यांच्या संपर्कातील कुटुंबातील एक व्यक्तीला स्राव तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आले आहे.

घटनेची माहिती कळताच दिवसभरात गावांत आणि जिल्हा परिषद शाळा येथे ग्रामपंचायत व ग्राम दक्षता समिती यांनी ट्रॅक्टरने जंतूनाशक फवारणी करून घेतली. यावेळी सरपंच प्रज्ञा सोनटक्के , उपसरपंच शिवाजी गापाटं, पोलीस पाटील दिलीप गायकवाड, ग्रामसेवक सुदाम बनसोडे, तलाठी चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ मारकळी यांनी फवारणी केली.

यावेळी बाहेरुन आलेल्या लोकांची माहिती त्वरित प्रशासनाला द्यावी. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. आलेल्या लोकांची नावे उघड होऊन करोना प्रादुर्भाव रोखणे शक्य होईल असे तहसीलदार रुपेश सुराणा यांनी म्हटले.

करोना संक्रमीत आढळलेला भोळसर तरुण दोन वेळेस प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन पळालेला आहे. तसेंच त्याच्या वडिलांच्या सांगण्याप्रमाणे नगर येथील बसस्थानकातून हा तरुण गायब झाला मात्र तो घोडेगाव येथे कसा पोहचला, कुणाच्या गाडीत आला, कसा आला, कुणासोबत आला व आणखी कुणाच्या संपर्कात आला, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

ताज्या बातम्या

गोळीबार

श्रीरामपूरच्या पूर्णवाद नगर परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

0
श्रीरामपूर | प्रतिनिधी शहरातील पूर्णवाद नगर परिसरात गुरुवारी सकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील...