नाशिक | Nashik
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी काल (बुधवारी) माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कौतुक केले होते. यावेळी त्यांनी भाजपमध्ये (BJP) जाण्याची ऑफर आली तर विचार करू असेही म्हटले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. परंतु, आता यावर खासदार कोल्हे यांनी स्पष्टीकरण देतांना आपण शरद पवारांसोबतच ठाम असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या चर्चांवर तात्पुरता का होईना पडदा पडल्याचे दिसत आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले की, “मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना ‘इन्फ्रामॅन’ म्हणणे आणि ‘ऑफरवर विचार करू’ असे बोलणे, हा निव्वळ पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भातील विषय होता. माझ्या या वक्तव्याचा पूर्णपणे वेगळा आणि राजकीय अर्थ काढण्यात आला. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे एकत्र असून, भविष्यातही एकत्रच राहील. आम्ही अशा कोणत्याही निरर्थक चर्चांकडे अजिबात लक्ष देत नाही”, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की,”आमची सर्वांची मागणी ही आहे की पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे (Pune-Nashik Semi-High-Speed Railway) जी आधी ठरली होती, त्याच पद्धतीने व्हावी. महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या हितासाठी शरद पवार साहेब जे आदेश देतील, जे धोरण ठरवतील, त्याचेच पालन आम्ही सर्व जण करणार आहोत. सुप्रिया सुळे या आमच्या गटनेत्या असून, आमचे सर्व खासदार (MP) एकत्र आहेत. ज्या काही चर्चा सुरु आहेत त्याबाबत मला कल्पना नाही”, असे देखील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले.




