Friday, May 3, 2024
Homeनगरयंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणार

यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या पार्श्वभुमीवर नगर शहरातील मानाच्या गणपती मंडळांची बैठक रविवारी झाली. यात शहरातील 12 मानाच्या मंडळांनी करोना संसर्गाच्या धोक्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या निर्णय घेतला.

- Advertisement -

यावेळी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, शहर पोलिस उपाधिक्षक संदिप मिटके, संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, मनेष साठे, स्वप्नील घुले, ऋषीकेश कावरे यांच्यासह माळीवाडा परिसरातील मानाच्या गणपती मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अ‍ॅड. आगरकर म्हणाले, सध्या करोनाच्या पार्श्वभुमीवर मंदिरे बंद आहेत. त्याचबरोबर अनेक सण-समारंभही घरीच साध्या पद्धतीने साजरे झाले आहेत. आताही येणारा गणेशोत्सव हा घरोघरी व सार्वजनिक स्वरुपात साजरा होणारा असला तरी नगरमधील करोना विषाणुची प्रादुर्भावाची परिस्थिती पाहत सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय या ठिकाणी झाला आहे.

शहरातील मानाच्या मंडळांनी एक चांगला निर्णय घेतला आहे. यामुळे कोणत्याही प्रकाराचे कार्यक्रम होणार नाहीत व गर्दीही होणार नाही. पुढील वर्षी करोनाचे संकट दूर झाल्यावर मोठ्या स्वरुपात गणेशोत्सव साजरा करु. ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरातही साध्या पद्धतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात येणार असून, विसर्जन मिरवणुकही रद्द करण्यात आलेली आहे. प्रशासनास सर्वतोपरि सहकार्य करु, असे सांगितले.

याप्रसंगी नगरसेवक बोराटे म्हणाले, शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व मानाच्या मंडळाने यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम न घेता अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व मंडळांचे एकमत झाले आहे. माळीवाडा परिसरातील सर्व मंडळांचा हा एकमुखी निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी पोलिस उपाधिक्षक मिटके म्हणाले, शहरात करोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे येणारा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा न करता साध्या पद्धतीने साजरा करण्याचे प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. त्या आवाहनास शहरातील मानाच्या गणपती मंडळांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा प्रतिसाद देत चांगला निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. याप्रमाणेच नगर शहरातील व जिल्ह्यातील मंडळांनीही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले.

या बैठकीस संगम तरुण मंडळाचे ऋषीकेश कावरे, माळीवाडा तरुण मंडळाचे निलेश खरपुडे, आदिनाथ तरुण मंडळाचे गणेश हुच्चे, दोस्ती मित्र मंडळाचे सुनिल जाधव, नवजवान तरुण मंडळाचे अंकुश ढुमणे, महालक्ष्मी तरुण मंडळाचे मनिष साठे, कपिलेश्वर मित्र मंडळाचे रविंद्र जपे, नवरत्न मित्र मंडळाचे स्वनील घुले, समझोता तरुण मंडळाचे शिवाजी कदम, निलकमल मित्र मंडळाचे बाळासाहेब बोराटे, शिवशंकरतरुण मंडळाचे विशाल भागानगरे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या