Friday, May 3, 2024
Homeनगरमहापालिकेतील पाठिंबा काढल्यास राष्ट्रवादीला सहकार्य ; शिवसेनेच्या बैठकीत चर्चा

महापालिकेतील पाठिंबा काढल्यास राष्ट्रवादीला सहकार्य ; शिवसेनेच्या बैठकीत चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यात जरी शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र होऊन सत्तेवर आले असले, तरी अहमदनगर शहरात मात्र या दोघांचे अद्याप सूत जमलेले नाही. महापालिकेत राष्ट्रवादीने भाजपला दिलेला पाठिंबा काढला तरच सूत जमण्याबाबत काही होऊ शकते, अशी चर्चा शुक्रवारी शिवसेनेच्या बैठकीत झाली.
नगर शहरात राष्ट्रवादी आणि शिवसेना कट्टर विरोधक आहेत. सर्वच निवडणुकीत या दोन पक्षांत लढती झालेल्या आहेत. विशेष म्हणजे या लढती केवळ पक्षीय न राहता अनेकदा वैयक्तिक पातळीवरही आलेल्या आहेत.

केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडात राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांना शिवसेनेने गुंतवले असा आरोप राष्ट्रवादीकडून सातत्याने होत असतो. त्याच पार्श्‍वभूमीवर महापालिकेची सार्वजनिक आणि त्यापूर्वीच्या पोटनिवडणुका झाल्या होत्या. एवढेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीतही याचे पडसाद उमटले होते. विशेष म्हणजे याचा फायदा घेत भाजपचा एक मोठा गट राष्ट्रवादीच्या जवळ गेला होता. आजही हा गट आणि राष्ट्रवादी यांच्यात मेतकुट आहे. या गटाचे अनेक नेते विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचारात नव्हते. राज्यात शिवसेनेने भाजपला धोका दिल्यामुळे आता भाजपच्या या नेत्यांच्या पक्षविरोधी कारवाईला उलट बळ मिळाले आहे.

- Advertisement -

केवळ भाजपच नव्हे, तर शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी पक्षविरोधी काम केल्याची चर्चा आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत यावरही चर्चा झडली. माजी शहरप्रमुख संभाजी कदम आणि ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांची नावे घेऊन या बैठकीत तक्रारी करण्यात आल्याचे समजते. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यामुळे विधानसभेतील पराभवानंतर शिवसेनेत आलेली मरगळ दूर करण्यासाठी ही बैठक होती, असे सांगण्यात येते. मात्र निवडणुकीत कोणी काय केले, यावरच बराचवेळ चर्चा झडल्याचे समजते. या बैठकीपासून नगरसेवकांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले होते. लवकर नगरसेवकांचीही बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात एकत्र आलेले शिवसेना व राष्ट्रवादी यांचे नगरमधील मनोमिलन कसे घडणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. महापालिकेत केवळ शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले. महापालिकेतील सत्तेचा कोणताही वाटा न घेता राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिलेला आहे. शिवसेनेला हे शल्य कायम आहे. सर्वाधिक नगरसेवक निवडून येऊनही तीसर्‍या क्रमांकावर असलेल्या भाजपला सत्तेत संधी मिळाल्याचे मोठे दुःख आहे. महापालिका निवडणुकीनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजपची युती झाली.

त्यामुळे महापालिकेत राष्ट्रवादीचा पाठिंबा काढून शिवसेनेला सोबत घ्यावे, असे प्रयत्न मध्यंतरी झाले होते. मात्र त्यास भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शिवसेनेच्या संतापात आणखी भर पडली. राज्यातील नव्या महाविकास आघाडीमुळे राष्ट्रवादीला शिवसेनेची नगरमध्ये साथ हवी असल्यास त्यांनी महापालिकेतील भाजपचा पाठिंबा काढून घ्यावा, अशी अट टाकण्यात येणार आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत तशी चर्चा झाल्याचे खात्रीलायक समजते.

अनेक नगरसेवक संशयाच्या भोवर्‍यात
बैठकीत माजी शहरप्रमुख संभाजी कदम, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांच्या नावाची चर्चा झाली असली, तरी इतरही शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी विरोधात काम केल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे केवळ वरील दोघेच नव्हे, तर इतरही अनेक नगरसेवक संशयाच्या भोवर्‍यात असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या