Friday, May 3, 2024
Homeनगरशिवसेनेच्या कार्यक्रमात भाजपचा पाहुणा

शिवसेनेच्या कार्यक्रमात भाजपचा पाहुणा

अहमदनगर (प्रतिनिधी) – वार्डातील चारही नगरसेवक शिवसेनेचे पण त्यांच्या वार्डातील विकास कामांचा नारळ फोडण्यासाठी पाहुणा मात्र भाजपचा. राज्यात शिवसेना-भाजपचे बिनसले असले तरी अहमदनगर शहरात मात्र जुळत-मिळत सुरू असल्याचे चित्र समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नगर शहरातील 15 नंबर वार्डात हा प्रकार घडला.

या वार्डातील चारही नगरसेवक शिवसेनेचे आहेत. अनिल शिंदे, सुवर्णा जाधव, प्रशांत गायकवाड आणि विद्या खैरे अशी शिवसेना नगरसेवकांची नावे आहेत. याच वार्डातील काटवन खंडोबा रोडचे काम सुरू करण्यासाठी नारळ वाढविण्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात भाजपचे माजी शहरजिल्हाध्यक्ष अ‍ॅड अभय आगरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते विकास कामाचा नारळ फोडण्यात आला. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच भाजपने आगरकर यांची जामखेड नगरपंचायतीच्या निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती केली आहे. या कार्यक्रमात आगरकर यांनी शिवसेना नगरसेवक प्रभागातील विकास कामांत सक्रीय असल्याच्या शब्दात स्तुतीसुमनेही उधळली.

- Advertisement -

गत अनेक वर्षांपासून काटवन खंडोबा रस्त्याच्या काम रखडले होते. परंतु या भागाच्या नगरसेवकांच्या एकत्रित प्रयत्नाने ते आता मार्गी लागले आहे. हा रोड स्टेशन रोड-आयुर्वेद कॉर्नरला जोडलेला असल्याने या रस्त्यावरील वाहतुक बरीच वाढली आहे. त्यामुळे हा रस्ता चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे होते. रस्ता पूर्ण झाल्यावर नागरिकांची मोठी सोय होणार आहे. सर्व नगरसेवक प्रभागातील कामांबाबत सक्रिय आहेत. परंतु चांगले काम होण्यासाठी थोडा वेळ लागत असतो. त्यामुळे या रस्त्याच्या कामास उशीर झाला असला तरी आता हे काम मार्गी लागले असल्याने या रस्त्यावरुन सुरु असलेल्या राजकारणाला पूर्णविराम मिळाला आहे. नागरिकांनीही आपल्या प्रश्नांसाठी पाठपुरावा केला पाहिजे, नगरसेवक ते सोडवतीलच, असा विश्वास माजी नगराध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

नगरसेवक अनिल शिंदे, नगरसेविका सुवर्णा जाधव, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, दत्ता जाधव, किसन व्यवहारे, दिनेश दळवी, संतोष जाधव, पुष्पा व्यवहारे, संदिप बोरुडे, बबलू ससे, परेश व्यवहारे, भाऊसाहेब कर्पे, अतुल गायकवाड, ऋषीकेश जाधव, वैजीनाथ लोखंडे, विशाल लोळगे, शिवाजी जाधव, बाबासाहेब डागवाले यावेळी उपस्थित होते.

दिपक खैरे, प्रशांत गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश दळवी यांनी केले तर दत्ता जाधव यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या