वाळकी येथील शेतकर्याची फसवणूक चाळीस किलोच्या गोणीत साडेचार किलो वाळू
अहमदनगर (वार्ताहर)- सेंद्रिय शेती करण्याकडे शेतकर्यांचा कल वाढत असताना विविध कंपन्यांच्या सेंद्रीय खताला मागणी वाढत आहे. त्याचाच गैरफायदा घेत कंपनीकडून 40 किलोच्या गोणीत साडेचार किलो वाळू मिसळून शेतकर्यांची फसवणूक केली आहे. नगर तालुक्यातील वाळकी (ता. नगर) येथील शेतकरी अनिल आदिनाथ कासार यांनी फळबागेसाठी आणलेल्या सेंद्रीय खतात वाळूची भेसळ आढळून आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
कासार यांनी स्थानिक कृषी सेवा केंद्रातून खत घेतले. मात्र याचा शेतीत वापर करताना गोणीत वाळूचे मिश्रण असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी कंपनीकडून फसवणूक होत असल्याची तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, रवींद्र माळी यांनी तपासणी केली असता चाळीस किलोच्या गोणीत चार ते पाच किलो वाळू असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले.
जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक दीपक पाटील, कृषी अधिकारी नितनवरे, रवींद्र माळी यांनी वाळकी येथील कृषी सेवा केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध असणार्या सेंद्रीय खताची तपासणी केली. या खताचा नमुना पुणे येथील लॅबकडे पाठविला आहे. त्याचबरोबर विक्रीसाठी ठेवलेल्या या खताचे बिलच दुकानदाराकडे नसल्याने खताची विक्री न करण्याचे आदेश दीपक पाटील यांनी दुकानदारास दिले आहेत. पुण्यातील लॅबकडून 15 दिवसांत तपासणी अहवाल येईल.
त्या अहवालानुसार कंपनीविरोधात कारवाई करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले. दुष्काळ व अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना खत कंपन्यांकडून शेतकर्यांची फसवणूक केली जात असल्याने शेतकर्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
कंपनीवर कारवाई करा : भालसिंग
शेतकरी कायम दुष्काळाशी सामना करीत आहे . ‘खर्च जास्त उत्पादन कमी’ यामुळे शेतकर्यांमध्ये कर्जबाजारीपणा वाढला आहे. त्यात खत कंपनीकडून शेतकर्यांच्या माथी वाळू मिश्रीत खत मारले जात आहे. हा शेतकर्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचाच प्रकार आहे. शेतकर्यांची फसवणूक करणार्या खत कंपनीविरोधात कठोर कारवाई करावी. कंपनीकडून शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी. गावोगावी बोगस खत विक्री होत असल्याचे दिसत असून अशा दुकानांवर कारवाई होणे गरजेचे आहे. कृषी अधिकार्यांनी याबाबत योग्य ती कारवाई करून शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केली.
तक्रारदार शेतकर्यावर तडजोडीसाठी दबाव
याबाबत शेतकरी अनिल कासार यांनी सेंद्रीय खत कंपनीच्या प्रतिनिधींना माहिती देताच कंपनी प्रतिनिधींकडून तक्रार दाखल करून काय साध्य होणार? असा सवाल केला. तुमचा खर्च देण्यास तयार आहोत. अपेक्षा कळवा. त्याप्रमाणे तडजोड करू, असे सांगत कंपनी प्रतिनिधी माझ्यावर दबाव टाकत आहेत. त्याचे माझ्याकडे कॉल रेकॉर्डींग असल्याचे कासार यांनी सांगितले.