अहिल्यानगर (प्रतिनिधी)
जिल्ह्यात वाढत्या मानव-बिबट्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘एआय’ आधारीत बनावट वन्यप्राणी व्हिडिओ तयार करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्पष्ट केले. जिल्हा व्याघ्र कक्ष समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, विभागीय वनअधिकारी (दक्षता) नाशिक व समितीचे सदस्य सचिव डॉ. अजित साजणे, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, गणेश मिसाळ, अश्विनी दिघे, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे आदी उपस्थित होते. घार्गे म्हणाले की, सोशल मीडियावर एआयच्या साहाय्याने वन्यप्राण्यांचे खोटे, दिशाभूल करणारे आणि संवेदनशील व्हिडिओ तयार करून फिरवले जात आहेत. अशा गोष्टींमुळे अनावश्यक दहशत पसरते व कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करून अशा प्रकरणांना प्रतिबंध करण्यात येईल.
बिबट्यांच्या हालचालींबाबत चुकीची माहिती व्हायरल होऊ नये यासाठी पोलिसांच्या विविध गावांतील व्हॉट्सअॅप गटांमध्ये वनअधिकार्यांचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे योग्य माहितीची देवाणघेवाण होऊन जनजागृती अधिक प्रभावीपणे होईल, असेही घार्गे यांनी सांगितले. जिल्ह्यातील अलीकडील मानव-बिबट्या संघर्षाच्या घटनांचा सविस्तर आढावा उपवनसंरक्षक सालविठ्ठल यांनी बैठकीत मांडला. तसेच भविष्यातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांची माहिती समितीसमोर ठेवली.
गावपातळीवर वनसंवर्धनात अधिक लोकसहभाग मिळावा यासाठी ‘वन पाटील’ ही मानद संकल्पना राबविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. वन आणि वन्यजीव संवर्धनात रूची असलेल्या इच्छुकांची निवड करून त्यांच्या नियुक्तीसाठी शासनास प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. वनविभाग-पोलीस विभाग यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी बैठकीत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. क्षेत्रीय कर्मचार्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आवश्यक त्या सुविधा आणि प्रशिक्षणाची योजनाबध्द अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले.
वनविभागीय कर्मचार्यांना शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण
मानव-बिबट्या संघर्षाच्या प्रसंगी वनविभागातील क्षेत्रीय कर्मचार्यांना अधिक सक्षम करण्यासाठी पोलिसांकडून शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. दोन्ही विभागांच्या संयुक्त विद्यमाने मॉक ड्रिल आयोजित करून कार्यपध्दती अधिक प्रभावी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
‘ब्लॅक स्पॉट’ ओळख
वन्यप्राण्यांचे अपघात टाळण्यासाठी अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’ची नोंद घेणे, तसेच गावांतील जुन्या-नव्या विहिरींना सुरक्षात्मक कठडे बांधण्यासाठी शेतकरी व संबंधित विभागांना आवाहन करण्यात आले. मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची मदत तत्परतेने उपलब्ध करून दिली जाईल, असेही घार्गे यांनी स्पष्ट केले.





