छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar
नाशिक टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील मुख्य महिला आरोपी असलेली निदा खान २७ दिवस फरार होती. अखेर तिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस आणि नाशिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत निदा खानला अटक केले. निदा खानला अटक केल्यानंतर शुक्रवारी नाशिक रोड न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी निदा खानला ११ मे पर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या तिची एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी निदा खानबद्दल मोठे विधान केले आहे.
एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी आज च्या पक्षाच्या नगरसेवक आणि प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. निवडणूक आयोगाकडून राबवल्या जाणाऱ्या SIR मोहीमे दरम्यान आपण काय कामे करायची याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ओवेसींनी आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ओवेसी यांनी नाशिकच्या एका बहुराष्ट्रीय कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
तिचा या कंपनीशी कोणताही संबंध नाही
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “सर्वात पहिली गोष्ट ही आहे की, टीसीएस कंपनीचं स्टेटमेंट आपण पाहिले असेल की, त्या मुलीचा संबंध एचआर विभागाशी नव्हता. या प्रकरणात ९ एफआयआर रजिस्टर झाले आहेत. त्यापैकी एक एफआयआरमध्ये हर्टिंग रिलेजन सिंटेमेंटच्या नावाने निदा खान या मुलीचे नाव लिहिले गेले. तिसरी गोष्ट म्हणजे एफआयआर दाखल होण्यापूर्वीच या मुलीचे ट्रान्सफर झाले होते. तिचा या कंपनीशी कोणताही संबंध नाही”, असा दावा असदुद्दीन ओवेसी यांनी केला.
Nashik TCS Case : धर्मांतरासाठी ‘डिजिटल ब्रेन वॉशिंग’; निदा खानला चार दिवसांची पोलीस कोठडी
सगळा प्रकार सुशिक्षित मुस्लीम मुलामुलींना त्रास देण्यासाठी
नाशिक धर्मांतरण प्रकरण हा द्वेष भावनेतून केलेला प्रकार आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील आरोपी असलेली निदा खान हिच्याबाबतही असाच प्रकार घडत आहे. तिच्यावर केवळ आरोप झाले म्हणून तिची मिडिया ट्रायल करुन तिला दोषी ठरवण्याचा प्रकार सुरु आहे. मात्र, आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. न्यायालय या मुलीला निर्दोष ठरवेल, असा विश्वास असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला. तसेच हा सगळा प्रकार सुशिक्षित मुस्लीम मुलामुलींना त्रास देण्यासाठी करण्यात आला आहे, असा आरोपही ओवेसी यांनी केला. आपण आताच या सगळ्याचा निकाल देऊ शकत नाही. या प्रकरणात मिडिया ट्रायल सुरु आहे, असे असदुद्दीने ओवेसी यांनी म्हटले.
बुर्खा कधीपासून आक्षेपार्ह झाला?
“एफआयरममध्ये लिहिलं आहे की, तिच्या घरातून एक बुर्खा मिळाला. एक नकाब मिळाला. तिसरी वस्तू म्हणजे एक पुस्तक मिळालं. बुर्खा कधीपासून आक्षेपार्ह झाला? नकाब कधीपासून आक्षेपार्ह झाला? केव्हापासून प्रोफेट मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे पुस्तक मिळाले तर ते काय आहे?”, असा सवाल ओवेसी यांनी केला.
यापूर्वी दिल्ली पोलिसांनी अशाचप्रकारे काही मुलांना अटक केली होती. त्यांच्याकडे मिर्झा गालिबचे पुस्तक सापडले होते. कोर्टात ही बाब समोर आल्यानंतर त्या मुलांना सोडून देण्यात आले. अलाहाबाद कोर्टातही उर्दू शेर लिहला म्हणून काहीजणांना अटक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावेळीही न्यायालयाने याबाबत सवाल उपस्थित केले होते.
त्यामुळे नाशिक धर्मांतरण प्रकरणाबाबतही न्यायालय निकाल देईल आणि ती मुलगी निर्दोष ठरेल, तिच्यावरील कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही. मुसलमान समाजातील शिक्षित मुलामुलींना त्रास देण्यासाठी हे सगळे केले जात आहे. पण कायदा आपलं काम करेल, असा विश्वास यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला.
“या मुलीची कोर्टाकडून निर्दोष सुटका होईल. तिच्यावर कोणतीही केस दाखल होणार नाही. मला खात्री आहे की, कायदा आपलं काम करेल. तुम्ही कुणाला आरोपी बनवता तर त्याचा अर्थ असा होत नाही की त्याला शिक्षा झाली. आरोप लावणारे आहेत त्यांना कोर्टात पुराव्यानिशी सिद्ध करावं लागेल. त्याशिवाय तुम्ही आरोपी म्हणू शकत नाहीत. जो हा आरोप करत आहेत ते केवळ एका द्वेषापोटी करत आहेत. आता त्या मुलीला अटक करण्यात आली आहे. न्याय प्रक्रिया आपलं काम करेल. कायद्याने जे होईल ते आपल्यासमोर येईल. पण या प्रकरणाला कोणत्या पक्षासोबत जोडणं योग्य नाही”, अशी भूमिका ओवेसी यांनी मांडली.




