मुंबई । Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र, या एका महिन्यानंतरही या अपघाताबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचा खळबळजनक दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. “हा अपघात होता की घातपात? याची उत्तरे जोपर्यंत मिळत नाहीत, तोपर्यंत माझा लढा थांबणार नाही,” अशा स्पष्ट शब्दांत मिटकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
२८ जानेवारी रोजी खाजगी विमानाने मुंबईहून बारामतीकडे जात असताना अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला होता. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून आजही समर्थकांच्या मनात या अपघाताबाबत संशयाची पाल चुकचुकत आहे. मिटकरी यांनी याच संशयाला वाचा फोडली असून, त्यांनी रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही पाठिंबा दर्शवला आहे. “अजित दादांच्या मृत्यूबाबत जे कोणी प्रश्न विचारतील, मग ते रोहित पवार असोत किंवा अन्य कोणत्याही पक्षाचा आमदार, मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन,” असे मिटकरी यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे, या प्रकरणी आपल्याच पक्षातील काही नेत्यांकडून आपल्याला विरोध होत असल्याचे संकेतही मिटकरी यांनी दिले आहेत. “माझ्याच पक्षातील काही नेते मला विचारत आहेत की, तुम्ही या विषयावर इतके का बोलत आहात? तुम्ही हा प्रश्न का उपस्थित करत आहात? पण मला जे योग्य वाटते ते मी करत राहणार,” असे सांगत त्यांनी पक्षांतर्गत दबावाला न जुमानण्याचे संकेत दिले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून केवळ अजित पवारांच्या अपघाताचे सत्य बाहेर येणे हीच आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांच्या आठवणीने अमोल मिटकरी यावेळी भावूक झाले होते. गेल्या महिन्याभरात एकही दिवस असा गेला नाही की जेव्हा दादांची आठवण आली नाही, असे त्यांनी गदगदल्या स्वराने सांगितले. “अधिवेशन सुरू असताना आजही असे वाटते की, अजित दादा सभागृहात येतील, आमच्याशी चर्चा करतील आणि नेहमीप्रमाणे देवगिरी बंगल्यावर बैठकीसाठी आम्हाला बोलावतील. मात्र, आता दादा आपल्यात नाहीत ही कल्पना सहन होत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
२९ जानेवारी रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर लाखो समर्थक आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. राज्याच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व अशा प्रकारे अचानक निघून गेल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आता अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले ‘अपघात की घातपात’ हे प्रश्न येणाऱ्या काळात कोणते वळण घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.




