Saturday, May 2, 2026
HomeराजकीयRohit Pawar : …म्हणून सत्तेतील काही लोक VSR कंपनीला वाचवत आहेत; रोहित...

Rohit Pawar : …म्हणून सत्तेतील काही लोक VSR कंपनीला वाचवत आहेत; रोहित पवारांंनी सगळंच काढलं

मुंबई । Mumbai

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन या तपासावर तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. “अजित पवारांच्या अपघाताचा तपास ज्या संथ गतीने सुरू आहे, त्यावर माझा मोठा आक्षेप आहे. हा केवळ अपघात नसून घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे विधान करत रोहित पवारांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

- Advertisement -

रोहित पवार यांनी या अपघातासाठी जबाबदार असलेल्या ‘व्हीएसआर’ विमान कंपनीवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ही कंपनी आणि सत्ताधारी नेत्यांचे जवळचे संबंध असल्याचा दावा त्यांनी केला. “अजित पवार हे राज्याचे मोठे नेते आणि सत्तेत महत्त्वाच्या पदावर होते, तरीही या कंपनीवर कारवाई का केली जात नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रोहित पवार यांच्या मते, राजकीय वरदहस्त असल्यामुळेच तपास यंत्रणा या कंपनीकडे दुर्लक्ष करत आहेत.

पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीचे मालक विजय सिंग यांचा मुलगा रोहित सिंग याच्यावर निशाणा साधला. “रोहित सिंगकडे कोट्यवधींच्या आलिशान गाड्या आहेत. सुमारे ३५ कोटींच्या स्पोर्टस कार्स त्याच्या ताफ्यात आहेत. दीड-दोन वर्षांपूर्वी जयपूरमधील एका आलिशान हॉटेलमध्ये त्याचा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाला महाराष्ट्रातील अनेक बडे नेते, माजी मंत्री आणि अगदी आंध्र प्रदेशातील तेलगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख नेतेही उपस्थित होते,” अशी माहिती पवारांनी दिली. हेच संबंध तपासात अडथळा ठरत असल्याचे त्यांनी सूचित केले.

नागरी विमान वाहतूक मंत्री सध्या टीडीपी पक्षाचे आहेत आणि याच पक्षाच्या नेत्यांचे व्हीएसआरच्या मालकाशी घनिष्ठ संबंध आहेत, याकडे रोहित पवारांनी लक्ष वेधले. “जेव्हा व्हीएसआर कंपनीचे ऑपरेशन बंद करण्याची गरज होती, तेव्हा विमान वाहतूक मंत्र्यांनी या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतरही राज्यातील मंत्री याच कंपनीच्या विमानाने प्रवास करत आहेत, हे धक्कादायक आहे,” असे रोहित पवार म्हणाले.

अपघातानंतर तांत्रिक पुरावे नष्ट केले जात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. “व्हीएसआरचा मालक रोहित सिंग सध्या भारतात नाही, तो मायामीला (अमेरिका) निघून गेला आहे. या कंपनीचे व्यवहार आता दुबई आणि अमेरिकेत हलवले जात आहेत. ज्या विमानामुळे हा घातपात झाला, त्याचा मालक आज देशाबाहेर असताना त्याला कोणी मदत केली? मालकाला तात्काळ ताब्यात घेऊन सखोल चौकशी होणे गरजेचे होते,” असेही त्यांनी ठामपणे मांडले. रोहित पवार यांनी शेवटी आग्रही मागणी केली की, व्हीएसआर कंपनीवर तातडीने बंदी घातली जावी आणि या संपूर्ण प्रकरणाची आंतरराष्ट्रीय मानकांनुसार निष्पक्ष चौकशी व्हावी, जेणेकरून अजित पवारांच्या मृत्यूचे नेमके सत्य महाराष्ट्रासमोर येईल.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...