पुणे | Pune
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार) आज २६ वा वर्धापन दिन पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाचे सर्वच नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी राज्यातील राजकारणासह विविध विषयांवर भाष्य करत कार्यकर्त्यांना आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी निधी वाटपावरुन शिंदे गटाच्या मंत्र्यांवर निशाणा साधला.
उपममुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे नेते, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गेल्या महिन्यात अजित पवार यांना जोरदार लक्ष्य केले होते. तसेच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही ओबीसी समाज घटकांचा निधी अजित पवार देत नसल्याचे आरोप केले. लाडकी बहीण योजनेसाठी अजित पवार यांनी सामाजिक न्याय खात्याचा शेकडो कोटींचा निधी वळता केला, असा गंभीर आरोप मंत्री संजय शिरसायट केला होता. तसेच आदिवासी विभागाचा निधी वळता केल्याचाही आरोप अजित पवार यांच्यावर झाला. या सगळ्या आरोपांना त्यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या भाषणातून उत्तर दिले.
अरे पण मी माझ्या खिशातले पैसे देतो का?
काही जण म्हणतात की अजितदादा पैसे देत नाहीत, निधी देत नाहीत. अरे पण मी माझ्या खिशातले पैसे देतो का? एकदा अर्थसंकल्प मांडला की त्यासाठी टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातात. निधी काही एकदम दिला जात नाही असे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. समाजकल्याण विभागाचा निधी वळवल्याचा आरोप केला जातो, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत त्या विभागाला ३८ टक्के जास्त निधी दिला असेही अजित पवार म्हणाले.
पुढे अजित पवार म्हणाले की, “काहीजण सतत बदनामी करत आहेत. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला. ७ लाख कोटी रुपये अर्थसंकल्प जाहीर करताना ४१ टक्के निधी आदिवासी समाजाला दिला. पण खोटी माहिती देऊन आरोप केले जातात. यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल कमी होऊन त्यांच्याही मनात शंका येण्याची शक्यता अजित पवार यांनी बोलून दाखवली.. मागील वर्षाच्या तुलनेत ३८ टक्के जास्त निधी यंदा दिला आहे. मुख्यमंत्री देखील याबाबत बोलले. मात्र त्याला पाहिजे तशी प्रसिद्धी मिळाली नाही.”
पैशांचे सोंग करता येत नाही
निधी वळविण्याच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नाव घेणे टाळले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर अनेकदा स्पष्टीकरण दिले आहे, मी देखील माझी बाजू मांडली आहे. पण पैशांचे सोंग करता येत नाही, हे काहींच्या लक्षात येत नाही, असे सूचकपणे अजित पवार म्हणाले.
म्हणून भाजपसोबत गेलो
“मला आजही १० जून १९९९ हा दिवस आठवतो. शरद पवार आणि इतर काही मान्यवरांनी एकत्र येत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत पक्षाने कधीही मागे वळून पाहिले नाही. आपल्या पक्षाला कधीही बहुमत मिळाले नाही. आपल्याला नेहमीच सत्तेत सहभागी व्हावे लागले. कारण आधीपासूनच राजकारणाची अशी परिस्थिती निर्माण झाली की एका पक्षाची सत्ता येण्याचे दिवस संपले आहेत. कारण केंद्रात देखील कुणाला यूपीए किंवा कोणाला एनडीए अशी आघाडी आणि युती करावी लागल्याची परिस्थिती देशाने पाहिली आहे. पण सर्वांनी साथ दिल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहे”, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
“तिकडे सेक्युलर विचारांचे चंद्रबाबू नायडू देखील भाजपाबरोबर आलेले आहेत. एकेकाळी ममता बॅनर्जी या देखील एनडीए बरोबर होत्या. तसेच लालू प्रसाद यादव हे देखील एकेकाळी एनडीए बरोबर होते. शेवटी काय असतं की राज्याचा विकास झाला पाहिजे.असे ही अजित पवार म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा