Tuesday, January 6, 2026
Homeमुख्य बातम्याRavindra Chavan on Ajit Pawar : रवींद्र चव्हाणांचे अजित दादांना सडेतोड प्रत्युत्तर;...

Ravindra Chavan on Ajit Pawar : रवींद्र चव्हाणांचे अजित दादांना सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले…

पुणे । Pune

राज्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महापालिका निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला असून येत्या १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला असून, आता भाजप आणि अजित पवार गट आमनेसामने आले आहेत.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील प्रचारसभेत भाजपवर घणाघाती टीका केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) कारभारावर बोट ठेवत त्यांनी भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे. शहरात सध्या कोणाचाही वचक राहिलेला नसून, लूटमार करणारी एक नवी ‘गॅंग’ तयार झाली आहे. या भ्रष्टाचारी राक्षसांचे दहन करण्यासाठीच आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत.” अजित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी भाजपची भूक ‘राक्षसी’ असल्याची टीका केली. “माझ्याकडे भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर हप्तेखोरी सुरू आहे,” असा खळबळजनक गौप्यस्फोट करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

YouTube video player

अजित पवारांच्या या थेट हल्ल्यानंतर भाजपने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुण्यात प्रचाराचा शुभारंभ करताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांना कडक शब्दांत इशारा दिला. चव्हाण म्हणाले की, “अजित पवारांनी इतरांवर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या पक्षाकडे पाहावे. ते कोणाबद्दल बोलत आहेत याचे भान त्यांनी ठेवावे. आम्ही जर आरोप करायला सुरुवात केली, तर अजित पवारांना मोठी अडचण निर्माण होईल, हे त्यांनी विसरू नये.” रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांना सल्ला दिला की, आरोप-प्रत्यारोप करताना त्यांनी मर्यादा पाळावी. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पक्षावर टीका करणे त्यांना महागात पडू शकते, असा संकेतही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या विकासकामांचा पाढा वाचला. ही निवडणूक पुण्याच्या विकासासाठी आणि नागरी सुविधांसाठी असल्याचे त्यांनी सांगितले. “केंद्र आणि राज्यात महायुतीचे सरकार अत्यंत गतिमान पद्धतीने काम करत आहे. पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारले असून ३३ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. महाविकास आघाडीच्या काळात मेट्रोचे काम रखडले होते, कारण त्यांना विकास करायचाच नव्हता,” अशी टीका चव्हाण यांनी केली. पुण्यातील पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारने कोट्यवधींचा निधी दिला असून, ही कामे केवळ मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वामुळेच शक्य झाल्याचा दावा त्यांनी केला. १५ जानेवारीच्या मतदानापूर्वी महायुतीतील हा संघर्ष नेमके काय वळण घेतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या