Monday, May 20, 2024
Homeनगरअजित पवार ठरवणार आज जिल्हा बँकेचा नवा अध्यक्ष

अजित पवार ठरवणार आज जिल्हा बँकेचा नवा अध्यक्ष

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आशिया खंडातील अग्रणीय आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची कामधेनू मानल्या जाणार्‍या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नवा अध्यक्ष कोण होणार, हे राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आज मंगळवारी (दि.7) ठरवणार आहेत. तसेच त्यांनी निश्चित केलेल्या नावावर शिक्कामोर्तब होत बँकेचे संचालक मंडळ बुधवारी (दि. 8) नव्या अध्यक्षाची निवड करणार आहे? यासह राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नगर जिल्ह्यात आक्रमक झालेले विखे पिता-पुत्र बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लक्ष घालणार का? भाजपचा उमेदवार अध्यक्षपदासाठी उभा करणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

- Advertisement -

दरम्यान बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीमध्ये देखील चांगलीच स्पर्धा निर्माण झाली असून शेवगाव-पाथर्डीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले, बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर व श्रीगोंद्याचे युवा नेते आणि माजी आमदार राहुल जगताप अध्यक्षपदासाठी अंगाला हळद लावून बसले असून ऐनवेळी अध्यक्षपदाची वरमाला कोणाच्या गळ्यात पडणार हे बुधवारी दुपारनंतर कळणार आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2020 मध्ये झाली आहे.

या निवडणुकीत बँकेच्या 21 संचालकांपैकी राष्ट्रवादीचे 10, काँग्रेसचे चार, भाजपचे 6 व एक शिवसेना असे पक्षीय संचालक विजयी झालेले असले तरी यात राहात्याचे संचालक वगळता उर्वरित सर्व संचालकांनी काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते आ. अजित पवार यांचे नेतृत्व मान्य करत बँकेच्या राजकारणात पक्षीय जोडे बाजूला ठेवले होते. मात्र, त्यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी होती आणि आताची वेगळी आहे.

बँकेच्या निवडणुकीनंतर अध्यक्षपद राष्ट्रवादीला व उपाध्यक्षपद काँग्रेसला दिले गेले. त्यावेळी महानगर बँकेचे अध्यक्ष व युवा नेते अ‍ॅड. उदय शेळके यांना अध्यक्षपद देण्यात आले होते. पण दुर्दैवाने काही दिवसांपूर्वी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाल्याने अध्यक्षपद रिक्त झाले आहे. शेळके यांच्या निधनानंतर नवीन चेअरमन निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम लावण्याची मागणी ठरावाव्दारे फेबु्रवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संचालक मंडळाने सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे केली होती. त्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरणाने चेअरमन पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे व निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांची नेमणूक केली आहे. उद्या बुधवारी (दि.8) सकाळी 11 वाजता संचालक मंडळाच्या विशेष सभेत चेअरमनपदाची निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या वर्तुळात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

विखेंच्या करिष्म्याकडे लक्ष

अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज दुपारी चार वाजता राष्ट्रवादीच्या संचालकांची नगरमध्ये शासकीय विश्रामगृहावर आ. पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत चर्चा होणार असून यात इच्छूक आपली बाजू मांडणार आहे. माजी आ. घुले यांनी स्वतंत्र यंत्रणे मार्फत अध्यक्षपदासाठी फिल्डींग लावली असून माजी आ. जगताप यांनी श्रीगोंदेकरांमार्फत आधीच आ. पवार यांची भेट घेवून अध्यक्षपदाची मागणी नोंदवलेली आहे. बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक सीताराम पाटील गायकर हे आपली खिंड स्वतंत्रपणे लढवत आहेत. यासर्व गोंधळात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. विखे पाटील काय करिष्मा करणार याकडेही जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या