Monday, November 25, 2024
Homeमुख्य बातम्या"यांच्या काय बापाचे राज्य आहे का"?; अमोल मिटकरी मनसे नेत्यांवर संतापले

“यांच्या काय बापाचे राज्य आहे का”?; अमोल मिटकरी मनसे नेत्यांवर संतापले

अकोला | Akola
आमदार अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्यानंतर हल्ल्यात सहभागी आरोपी मनसेचा सरचिटणीस कर्णबाळा दूनबळे यांच्या वर मिटकरींनी जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्णबाळा दुनबळे याला अटक करण्याच्या मागणीसाठी अमोल मिटकरी यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. याप्रकरणात कारवाई करण्यास पोलीस हलगर्जीपणा करत आहेत, असा आरोप अमोल मिटकरींनी केला. तसेच सर्व आरोपींना अटक करा अशी मागणी करत अकोला पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर मिटकरी यांनी मुलगी आणि भावासोबत आंदोलन केले.

राज ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर मनसैनिक संतप्त झाले होते. संतप्त मनसैनिकांनी शासकीय विश्रामगृहात अमोल मिटकरी थांबले असताना राडा घातला. या तोडफोड प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झालेल्या १३ पैकी ३ आरोपींना जामीन मंजूर झाला असून चार जणांना आज ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करत अमोल मिटकरी यांनी मुलगी आणि भावासह आंदोलन केले.

- Advertisement -

अमोल मिटकरी यांनी कर्णबाळा दुनबळे याच्यावर हल्लाबोल करताना त्याच्या अटकेचीही मागणी केलीय. या हल्ल्यानंतर कुटुंबियांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. शाळेत जाताना मुलीच्याही बसचा पाठलाग होत आहे का? असेही तिच्या निदर्शनास आले. कर्णबाळा, देशपांडे धमक्या देत आहेत. बापाचे राज्य आहे का?” असा संतप्त सवाल यावेळी अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला.

अमोल मिटकरी नेमके काय म्हणाले?
“मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर पोलीस मला संरक्षण देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत माझा परिवार माझ्या बरोबर खंभीरपणे उभा आहे. याचा मला अभिमान आहे. अजित पवार हे खमके नेते आहेत. माझ्या नेत्यावर कुणी गल्लीतला गुंडा बोलत असेल, तर त्याच्या थोबाडीत मारण्याची ताकद आमच्यात आहे”, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली.

“मुंबईत बसून संदीप देशपांडे धमकी देत आहेत. इथे कर्णबाळ दुनबळे धमकी देतात, यांच्या काय बापाचे राज्य आहे का? त्यामुळे आता काहीही झाले तरी चालेल, एकतर आता मी जिवंत राहीन, किंवा ते जिवंत राहतील”, असा इशाराही त्यांनी दिला.

“मनसेचे नेते कर्णबाळ दुनबळे आणि अकोला पोलिसांचे काय संबंध आहेत. हे पुढे आले पाहिजे. अकोल्यातल्या एका हॉटेलमध्ये काही पोलिसांनी त्यांची भेट घेतली आहे. ते मोकाट का फिरत आहेत. माझ्या सारख्या आमदारावर हल्ला होतो आणि तरीही आरोपींना तीन दिवस अटक का होत नाही?” असा प्रश्नही अमोल मिटकरी यांनी विचारला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या