अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अकोळनेर शिवारात पाच जणांच्या टोळीने दोन घरावर दरोडे घालत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सुमारे 29 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवनाथ भोर (वय 45, रा. अकोळनेर) यांनी फिर्याद दिली आहे. 19 मार्चच्या रात्री ही घटना घडली असून 20 मार्च रोजी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोर यांच्या राहत्या घरात 19 मार्च रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील कपाट उचकटून चोरट्यांनी सोन्याचे कर्णफुले, मंगळसूत्र, नाकातील दागिने तसेच चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. तसेच, फिर्यादी यांच्या बहिण मिनाक्षी उंडे यांच्या घरातूनही सोन्या-चांदीचे दागिने व पाच हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी अज्ञात पाच चोरट्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





