राहाता |प्रतिनिधी| Rahata
आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणार्या अशोक खरात याच्या पाखंडी साम्राज्याचा बुरखा आता पूर्णपणे फाटला असून या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण हादरवून सोडले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनापर्यंत पोहोचले आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर टीका करत, खरातच्या ‘शिवनिका संस्थान’ला मिळालेल्या बेकायदेशीर पाणी आरक्षणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
शिर्डी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळेच खरातचे हे काळे कारनामे उघड झाले आहेत. जर शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवले नसते तर हा नराधम आजही मोकाट असता, अशा शब्दांत विखे पाटील यांनी नाशिक पोलीस यंत्रणेवर ताशेरे ओढले. नाशिक क्राईम ब्रँच आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या नाकाखाली इतके मोठे गैरप्रकार सुरू असताना तिथली यंत्रणा नेमकी काय करत होती, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नाशिकची यंत्रणा केवळ शिर्डी पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारावर आता जागी झाली आहे, हे अत्यंत आश्चर्यकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लुकआऊट नोटीस जारी केली होती. ही नोटीस वेळेत निघाली नसती, तर आरोपी खरात परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता, असा खळबळजनक खुलासा मंत्र्यांनी केला आहे. पोलीस महासंचालकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर तपासाला वेग आला असला, तरी नाशिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच खरातचे साम्राज्य फोफावले असावे, असा थेट संशय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला.
खरातचे उच्चपदस्थ सरकारी अधिकार्यांशी किती जवळचे संबंध होते, याचे पुरावे आता समोर येऊ लागले आहेत. खरातच्या संस्थेला थेट दारणा धरणातून पाणीपुरवठा करण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारच्या काळात देण्यात आले होते. हे पाणी आरक्षण आता तातडीने रद्द करण्यात आले आहे. हे पाणी देण्याचा अध्यादेश कोणी काढला आणि यासाठी कोणाची शिफारस होती, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश विखे पाटील यांनी दिले आहेत. या चौकशीतून अनेक बड्या नावांचे खुलासे होण्याची शक्यता आहे. भविष्यात नाशिक पोलीस आणि संबंधित विभागातील अधिकार्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत.
धर्माच्या नावाखाली निरापराध महिलांचे शोषण करणार्या या नराधमाला कठोर शासन होणारच, असा ठाम विश्वास व्यक्त करतानाच विखे पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याचे स्वागत केले. त्यांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आता या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे असून यातून महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
शिर्डी पोलिसांनी जर गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवले नसते तर खरात सारखा नराधम आजही मोकाट असता. केवळ पोलिसांच्या तत्परतेमुळेच त्याचे काळे कारनामे उघड झाले आहेत, अशा शब्दांत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलिसांच्या धाडसी कारवाईचे कौतुक केले. हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे होते. मात्र अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि शिर्डीचे डीवायएसपी अमोल भारती यांनी या तपासासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. या त्रिमूर्तीने लावलेल्या तपासाच्या चक्रांमुळेच खरातचे धाबे दणाणले आणि अखेर हे मोठे रॅकेट उघडकीस आले. पालकमंत्र्यांनी या तिन्ही अधिकार्यांच्या कामगिरीचा जाहीर गौरव करत, त्यांच्या परिश्रमामुळेच पीडितांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाल्याचे सांगितले. ज्या पद्धतीने शिर्डी पोलिसांनी तपासाचा गाडा हाकला, तशी सक्रियता इतर यंत्रणांकडून का दिसली नाही? अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
अशोक खरातचे लागेबांधे अत्यंत खोलवर आहेत. उच्चपदस्थ सरकारी अधिकार्यांशी असलेल्या जवळकीमुळेच त्याला धरणातून पाणी मिळाले. या घृणास्पद प्रकारातील एकाही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही.
– ना. राधाकृष्ण विखे पाटील




