Tuesday, April 28, 2026
HomeराजकीयAmbadas Danve : छ. संभाजीनगरमध्ये माजी नगरसेवकाची गुंडगिरी दानवेंकडून मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ...

Ambadas Danve : छ. संभाजीनगरमध्ये माजी नगरसेवकाची गुंडगिरी दानवेंकडून मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल; मंत्री सावेंवर गंभीर आरोप

संभाजीनगर। Chhatrapati Sambhajinagar

शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक खळबळजनक व्हिडीओ पोस्ट केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या एका व्यक्तीला अत्यंत निर्दयीपणे मारहाण करताना दिसत आहे. मारहाण करणारी ही व्यक्ती राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचा अत्यंत निकटवर्तीय असून तो भाजपचा माजी नगरसेवक असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे.

- Advertisement -

अंबादास दानवे यांनी आपल्या ‘X’ (ट्विटर) हँडलवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित माजी नगरसेवक एका व्यक्तीच्या अंगावर मोठा दगड घालताना आणि त्याला बेदम मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ साधारण महिना-दोन महिन्यांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. “सत्ता आणि मंत्र्यांचे पाठबळ असल्यामुळेच या गुंडांना कायद्याची भीती राहिलेली नाही,” अशी घणाघाती टीका दानवे यांनी केली आहे.

या घटनेवरून दानवे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “‘पार्टी विथ डिफरन्स’च्या छत्राखाली या असल्या धिंगाण्याला किती काळ संरक्षण देणार मेवाभाऊ? ​दगडाखाली दबलेला तो लाचार माणूस आज कुठे आहे? सत्तेच्या माजात त्याचा आवाजच कायमचा दबून गेला?. ज्यांच्या हातात कायदा आहे, त्यांनी गुन्हेगाराची ‘भक्ती’ करण्यापेक्षा पीडिताला न्याय देण्याची हिंमत दाखवावी. ​सत्तेची ऊब असली की गुन्हेगारांचे हात कुणीही बांधू शकत नाही, हेच आजच्या सत्ताधारी मंडळींचे वास्तव आहे! बरोबर न देवभाऊ?” असही त्यांनी म्हंटल आहे.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना अंबादास दानवे यांनी म्हंटल आहे की, मारहाण करणारा हा माजी नगरसेवक भाजपचा असून मंत्री अतुल सावे त्याला सातत्याने वाचवत आहेत. “इतका गंभीर प्रकार घडूनही संबंधित पोलीस स्टेशनमध्ये साधी तक्रार किंवा गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. पीडित व्यक्ती सध्या कुठे आहे आणि सत्तेच्या दबावाखाली त्याचा आवाज दाबला गेला आहे का, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगरमधील जनतेने यापूर्वीही संबंधित व्यक्तीच्या अनाधिकृत बांधकामांबाबत तक्रारी केल्या होत्या, मात्र मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे कोणतीही कारवाई झाली नसल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. आता या व्हिडीओनंतर आणि दानवे यांनी लावलेल्या गंभीर आरोपांनंतर मंत्री अतुल सावे काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन होणे, हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

ताज्या बातम्या

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच...