Friday, September 18, 2026
HomeनगरAMC : महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता सर्वेक्षणाला वेग

AMC : महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता सर्वेक्षणाला वेग

53 टक्के काम पूर्ण || क्षेत्रफळात 30 टक्क्यांची वाढ

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे नव्याने मोजमाप व मूल्यांकन करण्याचे काम सध्या सुरू असून, यामध्ये 53 टक्के काम पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणाच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार अनेक मालमत्तांच्या क्षेत्रफळात सरासरी 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे येत्या काळात मालमत्ता कराच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सर्वेक्षण प्रगतीचा आढावा घेतला. शहरात एकूण एक लाख 32 हजार 637 मालमत्ता असून त्यापैकी 70 हजार 610 मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्वेक्षणाचे काम जुलै 2025 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ठेकेदार संस्थेला देण्यात आले आहेत.सर्वेक्षणाच्या माध्यमातून महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रकारच्या जमिनी, इमारती, घरे यांचे क्षेत्र, मूल्यांकन, तसेच करयोग्य माहिती संकलित केली जात आहे. यामध्ये डिजीटल छायाचित्रण, जिओ टॅगिंग, तसेच कारपेट व बिल्टअप क्षेत्रफळाचे डिजिटल मोजमाप यांचा समावेश आहे. हे काम महानगरपालिकेचे वसुली लिपिक, वसुली मदतनीस, व ठेकेदार संस्थेचे कर्मचारी यांच्या संयुक्त सहकार्याने केले जात आहे.

दरम्यान, काही नागरिकांमध्ये सर्वेक्षण करणार्‍या खासगी कर्मचार्‍यांबाबत संभ्रम निर्माण झाल्याने कामात अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त डांगे यांनी नागरिकांना आवाहन केले की, सर्वेक्षणासाठी येणार्‍या कर्मचार्‍यांकडे अधिकृत ओळखपत्र असते, ते तपासून त्यांना सहकार्य करावे. सर्वेक्षणाचे काम विनामूल्य असून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेचे म्हणणे आहे की, या सर्वेक्षणामुळे केवळ करआकारणीच नव्हे तर, मालमत्ताधारकांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि दर्जा सुधारण्यास मदत होईल. सर्वेक्षणाशी संबंधित तक्रारींसाठी ईमेल आयडीवर संपर्क साधावा. तसेच, तक्रारी अथवा शंका असल्यास सहाय्यक मूल्य निर्धारक व कर संकलन अधिकारी विनायक जोशी यांच्याशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सरपंचच ग्रामपंचायतींवर प्रशासक हवेत; न्यायालयात याचिका

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरपंचाचीच पुन्हा नियुक्ती करावी, या मागणीसाठी सरपंच परिषदेच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने परिस्थिती ‘जैसे...