अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिकेत सुमारे 700 सफाई कर्मचारी कार्यरत असून, शहराच्या स्वच्छतेवर वर्षाला सुमारे 9 कोटी रूपये खर्च होतात. त्यामुळे प्रत्येक सफाई कर्मचार्याने काम करताना शहराच्या स्वच्छतेला प्राधान्य देऊन 100 टक्के योगदान द्यावे. कामात कामचुकारपणा न करता महानगरपालिका संस्थेबाबत प्रामाणिकपणा ठेवून आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आयुक्त डांगे बोलत होते. महापौर ज्योती गाडे यांच्या हस्ते तसेच आयुक्त डांगे यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. आयुक्त डांगे म्हणाले, सफाई कर्मचारी घाणीत जाऊन काम करीत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी केली जाते. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक साहित्याचे वाटपही करण्यात येते. मात्र, शहरातील स्वच्छतेच्या कामात अजूनही मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे. मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी कचरा फेकलेला दिसतो. सफाई कर्मचार्यांनी दोन सत्रांमध्ये काम केल्यास 24 तास शहर स्वच्छ ठेवण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
महापौर गाडे म्हणाल्या, सफाई कर्मचारी हे शहरातील नागरिकांचे खर्या अर्थाने आरोग्यदूत आहेत. ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता ते पहाटेपासून शहराच्या स्वच्छतेचे काम करतात. त्यांच्या या कामामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मोठी मदत होते. त्यामुळे शहराची स्वच्छता राखणार्या सफाई कर्मचार्यांचे आरोग्यही सुदृढ राहणे आवश्यक आहे. शिबिरात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सफाई कर्मचार्यांची एक्स-रे, रक्तदाब, शुगर तसेच रक्त तपासणी करण्यात आली. शिबिराच्या निमित्ताने सफाई कर्मचार्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.
महापालिकेतील सफाई कर्मचार्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनाचे प्रमाण असल्याचे आयुक्त डांगे यांनी नमूद केले. तसेच काही कर्मचारी खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. खासगी सावकारांकडून कर्ज घेतल्यानंतर काही वेळा कर्मचार्यांचे बँकेचे पासबुक किंवा क्रेडिट कार्ड ताब्यात घेतले जाते. पगार झाल्यानंतर व्याजासह रक्कम काढून घेतली जात असल्याने कर्मचारी आर्थिक संकटात व कर्जबाजारीपणात सापडतो. त्यामुळे सफाई कर्मचार्यांनी व्यसनापासून तसेच खासगी सावकारीपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.




