अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शासनाकडून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला 15 व्या वित्त आयोगाव्दारे प्राप्त झालेल्या निधीतून 16 लाख 50 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा शहर लेखा व्यवस्थापक विजयकुमार महादेव रणदिवे व मनपाचा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे या दोघांनाही न्यायालयाने चार दिवसांची (17 फेब्रुवारीपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोग्य विभागाचे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सतीश राजुरकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाच्या तपासणीचे आदेश दिले होते.
यात शासकीय अभियानाच्या खात्यातून 15 लाख व 16 लाख 50 हजार रुपये रणदिवे यांच्या खात्यात वर्ग झाल्याचे आढळून आले. तसेच 15 लाख रुपये टप्प्याटप्प्याने पुन्हा अभियानाच्या खात्यात वर्ग करण्यात आले. मात्र 16 लाख 50 हजार रुपये अद्यापही खात्यात जमा झालेले नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. डॉ. राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपहारप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी डॉ. बोरगे व रणदिवे या दोघांना अटक करून गुरूवारी न्यायालयात हजर केले.
न्यायालयात तपासी अधिकारी प्रताप दराडे व सरकार पक्षाकडून अॅड. अमित यादव यांनी बाजू मांडली. रणदिवे याने डॉ. बोरगेशी संगनमत करून 16 लाख 50 हजार रुपये स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यात घेतले. त्याची विल्हेवाट काय लावली, तसेच, या दोघांनी त्यांच्या नियुक्ती काळात अधिकाराचा गैरवापर करून अशा प्रकारचे इतर गुन्हे केले आहेत का, याचा तपास करायचा असल्याने चार दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी तपासी अधिकार्यांनी केली. न्यायालयाने 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, डॉ. बोरगे याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने त्याच्यावर आता निलंबनाच्या कारवाईची शक्यता आहे.