अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवाराचे नाव संबंधित महानगरपालिकेच्या मतदार यादीत असणे अनिवार्य असून, उमेदवाराचे सूचक व अनुमोदक मात्र उमेदवार ज्या प्रभागातून निवडणूक लढवत आहे त्याच प्रभागातील मतदार असणे आवश्यक आहे, तसेच एका उमेदवारास एका प्रभागातील एकाच जागेसाठीच निवडणूक लढविता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.
अहिल्यानगरसह राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. प्रचार कालावधी, जाहिरात निर्बंध तसेच उमेदवारी प्रक्रियेबाबतच्या महत्त्वाच्या अटी स्पष्ट केल्या. महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची मुदत 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता संपणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमे, मुद्रित माध्यमे तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या प्रसारमाध्यमांव्दारे निवडणूक विषयक जाहिराती प्रसिध्द किंवा प्रसारित करता येणार नाहीत. या कालावधीनंतर कोणत्याही स्वरूपाचा प्रचार आचारसंहितेचा भंग ठरणार असल्याचेही स्पष्ट केले.
दरम्यान, उमेदवारी प्रक्रियेबाबत विविध नियम स्पष्ट केले. इच्छुक उमेदवाराचे नाव संबंधित महानगरपालिकेच्या मतदार यादीत असणे आवश्यक आहे. मात्र, उमेदवारासाठी सूचक व अनुमोदक हे उमेदवार ज्या प्रभागातून निवडणूक लढवत आहे त्याच प्रभागातील मतदार असणे बंधनकारक आहे. पक्षीय उमेदवार तसेच अपक्ष उमेदवार या दोघांनाही प्रत्येकी एक सूचक व एक अनुमोदक आवश्यक असून, उमेदवार एकापेक्षा अधिक प्रभागांत नामनिर्देशनपत्र दाखल करू शकतो.
तथापि, एका उमेदवारास एका प्रभागातील एकाच जागेसाठीच निवडणूक लढविता येईल. तसेच, एका जागेसाठी कमाल चार नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील, असेही त्यांनी नमूद केले. निवडणूक प्रक्रियेतील या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाणार असून, उमेदवार व राजकीय पक्षांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.




