नाशिक | प्रतिनिधी | Nashik
विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) आकडे पाहिले तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात असला तरी अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी प्रचार थांबवल्यानंतरही राजकीय धाकधूक कायम आहे. गिते यांचे नाव मतपत्रिकेवर राहणार असल्याने महायुतीने सावध पवित्रा घेतला असून मतदार नगरसेवकांच्या संपर्कासाठी विशेष यंत्रणा सक्रिय केली आहे. तर महायुतीचे मतदार सहलीला जात आहेत.
दुसरीकडे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) हालचालींनादेखील कमालीचा वेग आला आहे. विशेष म्हणजे आघाडीचा उमेदवार रिंगणात नसला तरी उभ्या असलेल्यांपैकी एखाद्या अपक्ष उमेदवाराला आघाडी पाठिंबा देणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांत गोकुळ गिते (Gokul Gite) यांना माघारी घेण्यासाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे यांच्यासह अनेक नेत्यांनी बैठका घेतल्यानंतर गिते यांनी पत्रकार परिषदेत प्रचार थांबवण्याची घोषणा केली.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : महायुतीची ‘सेफ हाऊस’ पॉलिटिक्स; शिवसेनेनंतर भाजपचेही नगरसेवक सहलीसाठी रवाना होणार
मात्र निवडणूक प्रक्रियेनुसार त्यांचे नाव मतपत्रिकेवर (Ballot Paper) कायम राहणार असल्याने चमत्कार होण्याची शक्यता नकारता येत नाही. मतदानाच्या दिवशी गिते किंवा अन्य अपक्ष उमेदवारांना अनपेक्षित मतदान झाल्यास निवडणुकीचे चित्र बदलू शकते. मतपत्रिकेवरील नाव कायम असल्याने कायदेशीरदृष्ट्या त्यांना मिळालेले प्रत्येक मत वैध राहणार आहे. त्यामुळे महायुतीकडून कोणतीही जोखीम न घेता मतदारांचे काटेकोर नियोजन सुरू करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर काही नगरसेवकांची मुंबईत सहल व मुक्कामाचे नियोजन करण्यात येत आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीची (Mahavikas Aagahdi) अद्याप मतदानाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर झालेली नसली तरी त्यांचा बैठकांचा जोर सुरू असल्याचे समजते. काही अपक्ष उमेदवार आमच्या संपर्कात असल्याचा दावादेखील आघाडीकडून करण्यात आला आहे. योग्य वेळी एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला जाऊ शकतो, तर महायुतीला धक्का देणार, असा दावाही करण्यात येत आहे.
आकडेमोडीवर भर
महायुतीकडे सुमारे ४६६ मतांचा दावा केला जात असला, तरी मतदानापूर्वी प्रत्येक मतदाराशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे. गटनेते, जिल्हाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू असून मतदानाच्या दिवशी कोणताही अनपेक्षित धक्का बसू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
हालचालींकडे लक्ष
गुरुवारी (दि.१८) मतदान होणार आहे. ती तारीख जवळ येत असताना अपक्ष उमेदवारांची भूमिका, महाविकास आघाडीचा अंतिम निर्णय आणि मतदार नगरसेवकांचे राजकीय कल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेवटच्या क्षणी होणाऱ्या राजकीय घडामोडी या निवडणुकीत नवे समीकरण निर्माण करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
आमच्याकडे सुमारे ५० मते आहेत. मात्र अद्याप पक्षश्रेष्ठींकडून कोणताही आदेश प्राप्त झालेला नाही. वरिष्ठ जो निर्णय घेईल त्यानुसार आम्ही मतदान करू.
केशव पोरजे, गटनेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांशी आमच्या बैठका सुरू आहेत. काँग्रेसचे १६ मतदार आहेत. काही अपक्ष उमेदवार आमच्या संपर्कात आहेत. योग्य वेळी भूमिका जाहीर करून महायुतीला धक्का देणार.
नीलेश (बबलू) खैरे, शहराध्यक्ष, काँग्रेस




