ओझे | विलास ढाकणे | Oze
नाशिक आणि सोलापूर (Nashik and Solapur) येथील दलाल (एजंट) आणि त्यांच्या साथीदारांनी संगनमत करून एका २४ वर्षीय तरुण शेतकऱ्याला (Farmer) लग्नाच्या नावाखाली अडीच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विवाहित आणि तीन मुलांची आई असलेल्या महिलेला अविवाहित असल्याचे भासवून दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) वणी येथील मंदिरात हा विवाह लावून देण्यात आला होता. या फसवणूक प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पोलीस ठाण्यात ९ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा गुन्हा पुढील तपासासाठी वणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी या टोळीतील संशयित महिलेला अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल जयवंत धावणे (वय २४, रा. नरखेड, ता. मोहोळ, जि. सोलापूर) हा तरुण शेती करतो. त्याच्यासाठी वधू शोधण्याचे काम सुरू असताना तो सोलापूर येथील एका एजंटच्या संपर्कात आला. या एजंटने नाशिकमधील (Nashik) एका दलालाशी संपर्क साधून विशालसाठी मुलगी शोधल्याचे सांगितले. मात्र, संबंधित महिला आधीच विवाहित असतानाही ती अविवाहित असल्याचा खोटा बनाव या टोळीने रचला. विशालच्या लग्नासाठी या टोळीने नियोजनबद्ध कट रचला होता. एका संशयित एजंटाला ५० हजार रुपये आणि नियोजित वधूच्या तथाकथित वडिलांना २ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार विशालने त्यांना पैसेही दिले. त्यानंतर ७ जून २०२६ रोजी दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी येथील एका मंदिरात विशाल आणि त्या महिलेचा विवाह लावून देण्यात आला.
विवाह सोहळा आटोपल्यानंतर विशाल धावणे, त्याची नवविवाहित पत्नी आणि इतर लोक एका वाहनाने निघाले होते. दरम्यान, एका ठिकाणी वाहन थांबले असता, एका संशयिताने वधूला गाडीतून उतरण्यास सांगितले. त्यानंतर ती महिला अचानक लपून बसली. या प्रकारामुळे विशाल आणि त्याच्यासोबत असलेल्या साक्षीदारांना संशय आला. त्यांनी तात्काळ त्या महिलेचा शोध घेऊन कसून चौकशी केली. तेव्हा सदर महिला आधीच विवाहित असून तिला तीन मुले असल्याचे सत्य समोर आले. हे ऐकून विशाल आणि त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ते घाबरून तेथून निघाले. यावेळी एका विना क्रमांकाच्या स्विफ्ट कारने त्यांच्या वाहनाचा पाठलाग देखील केला.
हा सर्व प्रकार सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) नरखेड, मोहोळ ते नाशिकमधील पंचवटी आणि दिंडोरीतील कसबे वणी दरम्यान घडला. फसवणूक झाल्यानंतर विशाल धावणे याने सोलापूर ग्रामीणच्या मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनास्थळ वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने हा गुन्हा वणी येथे वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे यांनी दिली. वणी पोलिसांनी या ठकबाजी प्रकरणी एकूण ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये विना क्रमांकाच्या स्विफ्ट कारमधील दोन अज्ञात पुरुष बापू अंधारे (रा. मालेगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर), आगर टाकळी, राहुल नगर (नाशिक) येथील एक संशयित, नाशिक येथील अज्ञात एजंट आणि तीन अज्ञात महिला, नाशिक येथील दोन अज्ञात पुरुष यांचा समावेश आहे.
दरम्यान, या टोळीतील मुख्य संशयित महिलेला पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. या टोळीने अशाच प्रकारे आणखी काही तरुणांची फसवणूक केल्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत. तर वणी पोलिसांनी सध्या लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. त्यामुळे मुला-मुलींचे विवाह जुळवताना वधु-वराची कौटुंबिक, सामाजिक पार्श्वभूमी आणि चारित्र्य व्यवस्थित तपासूनच निर्णय घ्यावा. अनोळखी दलालांवर अंधश्रद्धा ठेवून आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन नागरिकांना केले आहे.




